मुंबई - प्रजासत्ताक दिनी राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेण्याचे निर्देश आहेत, मात्र या प्रजासत्ताक दिनी नुकत्याच निवडून आलेल्या ग्रामपंचायतीत ग्रामसभा होणार नसल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.
सरपंचाची सोडत काढण्याचे आदेश
अनेक ग्रामपंचायतीत प्रशासक असल्याने वाढता ताण लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. त्याचबरोबर लवकरच निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीकरीता सरपंचाची सोडत काढण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
नव्या सरपंचाची निवड झाल्या नंतर त्या ग्रामसभा घेण्यात येतील , त्यामुळे 31 मार्च पर्यंत त्यांना ग्रामसभा घेण्याची सूचना देण्यात आली आहे. एक ।महिन्याच्या आधी सरपंचाची सोडत काढण्यात येईल.तो पर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गावातल्या भावकीत निर्माण झालेला तणाव ही काहीसा हलका होऊन वातावरण सामोपचाराचे होईल अशी मिश्किल टिप्पणी ही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणुकीचा गोंधळ कायम, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपकडून सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा
हेही वाचा - 'गाबा'विजय : बीसीसीआयचं टीम इंडियाला ५ कोटींचं बक्षीस