मुंबई - मुंबईमध्ये गेल्या पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार सुरू आहे. हा प्रसार काही प्रमाणात कमी झाला असतानाच ओमायक्रॉन हा नवा विषाणू समोर आला आहे. मुंबईत आज ३ रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग ( new 3 Omicron patient in Mumbai ) झाल्याचे निदान झाले आहे. यामुळे मुंबईतील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ५ झाली ( 5 Omicron patient in Mumbai ) आहे. या रुग्णांना गंभीर लक्षणे नसली तरी खबरदारीची उपाययोजना म्हणून संबंधित रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात विलगीकरणात असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
टांझानियातून आलेला प्रवासी पॉझिटिव्ह -
आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून म्हणजेच एनआयव्हीकडून जिनोम सिक्वेंसिंग नमुन्यामध्ये निदान झालेले ओमायक्रॉन विषाणू बाधित तीन रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. एक ४८ वर्षीय पुरुष टांझानिया येथून ४ डिसेंबर रोजी धारावीत आला होता. त्याची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये सदर व्यक्ती बाधित असल्याचे निदर्शनास आल्याने सदर नमुना जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात आला होता. या रुग्णाने कोविड लसीकरण केले नव्हते. या रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत. सदर रुग्णाच्या अतिजोखमीच्या संपर्कातील २ सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी कोणीही कोविड बाधित आढळून आले नाही.
लंडनहून आलेला प्रवासी पॉझिटिव्ह -
एक २५ वर्षीय पुरुष लंडन येथून १ डिसेंबर रोजी भारतात आला. त्याची कोविड चाचणी बाधीत आल्याने त्याचा वैद्यकीय नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाच्या कोविड लसीचे दोन्हीही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. सदर रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी कोणीही कोविड बाधित नाही.
गुजरातचा ३७ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह -
तसेच एक ३७ वर्षीय पुरुष गुजरातचा रहिवासी असून तो दक्षिण आफ्रिका येथून ४ डिसेंबर रोजी आला होता. ज्याची कोविड चाचणी केली असता रुग्णास कोविडची बाधा झाल्याचे निदर्शनास आल्याने त्याचा नमुना जिनोम सिक्वेनसिंगसाठी पाठविण्यात आला होता. या रुग्णाच्या कोविड लशीच्या दोन्हीही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. खबरदारीची उपाययोजना म्हणून विमानतळावरूनच या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत.
संपर्कातील निगेटिव्ह -
वरील तपशिलानुसार तिन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्याही कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी कोणीलाही कोविड बाधा झालेली नसल्याचे वैद्यकीय चाचणी अंती निदर्शनास आले आहे. आज अहवाल प्राप्त झालेल्या तीन रुग्णांमुळे कोविड विषाणूच्या ओमायक्राॅन प्रकाराने बाधित झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता पाच झाली आहे.
आरोग्य विभागाला माहिती द्या -
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरूप वर्तनाचा अंगीकार करावा. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिन्याभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत. त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.
हेही वाचा - Pune Omicron Cases : पुणेकरांना मोठा दिलासा... 7 पैकी 5 ओमायक्रॉनचे रुग्ण निगेटिव्ह