मुंबई - कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईमध्ये आज नव्याने 1510 रुग्ण आढळून आले आहेत, तर 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 38220 वर तर मृतांचा आकडा 1227 वर पोहोचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
शहरात कोरोनाचे नव्याने 1510 रुग्ण आढळून आले आहेत, तर 54 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 40 जणांचा मृत्यू गेल्या 24 तासात झाला असून 25 ते 28 मे दरम्यान 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू कोरोनाने झाल्याचा अहवाल आल्यावर त्यांचा समावेश आजच्या आकडेवारीत करण्यात आला आहे. 54 पैकी 39 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 31 रुग्ण पुरुष तर 23 महिला रुग्ण होत्या.
मुंबईत आज 356 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत आतापर्यंत एकूण 16364 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी 75 ते 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. 15 ते 18 टक्के रुग्णांमध्ये मध्यम स्वरूपाची तर 5 ते 7 टक्के रुग्णांमध्ये अत्यवस्थ लक्षणे तसेच इतर आजार आढळून आले आहेत. कोरोनाचे रुग्ण बरे होत असल्याने नागरिकांनी कोरोनाला घाबरू नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.