मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत आज नवे 1 हजार 174 रुग्ण आढळून आले आहेत. तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांवर पोहचल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
आरोग्य विभागाने दिेलेल्या माहितीनुसार कोरोनाबाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या 93 हजार 894 वर पोहोचली आहे. त्यापैकी मुंबईत सध्या 22 हजार 939 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनावर मात करणाऱ्या 750 रुग्णांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनावर आजपर्यंत मात करणाऱ्या 65 हजार 622 रुग्णांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. तर मृतांची संख्या 5 हजार 332 एवढी झाली आहे.
आज झालेल्या 47 मृत्यूपैकी 37 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 31 पुरुष आणि 16 महिला रुग्णांचा समावेश आहे. मुंबईमधून आज 750 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांवर पोहचल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. कोरोना रुग्णांच्या संख्येचा वाढीचा दर 5 ते 12 जुलैपर्यंत 1.36 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 51 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 732 चाळी आणि झोपडपट्टी असलेले विभाग कंटेनमेंट झोन म्हणून सील करण्यात आले आहेत. तर कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 6 हजार 751 इमारतीमधील काही माळे, काही विंग तर काही इमारती पूर्ण सिल करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोनाचे निदान करण्यासाठी 3 लाख 96 हजार 500 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.