मुंबई - तौक्ते वादळ मुंबईत धडकले असून त्याचा परिणामी मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत कुलाबा येथे १७.४ मिलिमिटर तर सांताक्रुझ येथे ११.९ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १८२ झाडे आणि फांद्या कोसळल्या आहेत, तर ६ ठिकाणी घराच्या भिंतीचे भाग पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडूनही माहिती देण्यात आली आहे.
पुढील २४ तासात आकाश ढगाळ राहणार असून मध्यम पावसासोबत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच या वादळामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली आहे. रेल्वे, समुद्री मार्ग आणि विमानसेवेवर याचा परिणाम झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बचाव पथके आणि एनडीआरएफची पथकेही तैनात करण्यात आली आहेत.
वादळामुळे मुसळधार पाऊस -
पश्चिम किनारपट्टीवर समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तौक्ते चक्रीवादळ निर्माण झाले आहे. पश्चिम किनारपट्टीवरून हे वादळ कर्नाटक, गोवा, रत्नागिरी, रायगड मार्गे मुंबईत दाखल झाले आहे. मुंबईच्या किनारपट्टीवरून हे वादळ पुढे गुजरातला जाणार आहे. या वादळामुळे मुंबईत काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासात म्हणजेच १७ मे रोजी सकाळी ८:३० पर्यंत गेल्या २४ तासात कुलाबा येथे १७.४ मिलिमीटर तर सांताक्रुझ येथे ११.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांवर सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत शहर विभागात ८.०३, पूर्व उपनगरात ३.१७ तर पश्चिम उपनगरात २.७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कुलाबा वेधशाळेने पुढिल २४ तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आकाश सर्वसाधारणतः ढगाळ राहील. मध्यम पावसासोबत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
६ ठिकाणी घरे कोसळली -
शहरात ५ ठिकाणी व पूर्व उपनगरात १ अशा एकूण ६ ठिकाणी घराचे व भिंतीचे भाग पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून मदत पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत यात कोणालाही मार नाही
सर्वच वाहतुकीवर परिणाम -
तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या वेशीवरून गुजरातकडे जाणार आहे. मात्र, सद्य स्थितीत मुंबई शहरात याचा प्रभाव जाणवत आहे, या पार्श्वभूमीवर मुंबईत सतर्कतेच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच या वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बांद्रा वरळी सिलिंक प्रवासासाठी बंद करण्यात आला आहे.
रेल्वे व रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. बांद्रा-वरळी सि लिंक सकाळी १० वाजल्यापासून वाहतूकी करिता बंद करण्यात आला आहे. मुंबईत मध्य रेल्वेवर घाटकोपर आणि विक्रोळीमध्ये ओव्हर हेडवर वायरवर झाड पडल्याने काही काळासाठी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. ओव्हर हेडवरील झाड काढल्यावर रेल्वे सेवा सुरळीत सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. अंधेरी सब वे पाणी भरल्याने बंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विमान वाहतूकही दुपारी 2 वाजेपर्यंत बंद करण्यात आली आहे.
किनारपट्टीत भागात मदतीसाठी एनडीआरएफ टीम दाखल-
तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पावसासंदर्भात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईच्या बऱ्याच भागात चक्रीवादळाचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. सध्या शहर उपनगरात जोरदार वारे वाहत आहेत, तसेच मुसळधार पाऊस सुरू असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी मुंबईत ठीक ठिकाणी तात्पुरती निवारा घरे बांधली गेली आहेत. संरक्षणासाठी एनडीआरएफचे 3 आणि अग्निशमन दलाचे 6 पथक तैनात केले आहेत.
मुंबईतील वेगवेगळ्या चौपाट्यांवर NDRF च्या टीम बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफ टीम दादर चौपाटी, जुहू चौपाटी आणि शिवाजी पार्कला पोहोचलेली आहे.
सीएसटीएम स्थानकावरील पत्रे उडाले-
वादळामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या छतावरील पत्रे उडाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेची सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचली आहे. त्यांनी या परिसरात प्रवाशांना बंदी घातली आहे.