मुंबई - राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमैया यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आज राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सोमैयांचा समाचार घेतला. सध्या सोमैया यांच्याकडून बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करण्याचा व्यवसाय सुरू असल्याची खरमरीत टीका मलिक यांनी केली. त्यामुळे हा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
शिवडी कोर्टाचे आदेश
भाजपा नेते किरीट सोमैया यांनी बेछूट व बिनबुडाचे आरोप करण्याचा उद्योग सुरू केला आहे. ते ज्या संस्थेची बदनामी करत होते, त्या संस्थेने सोमैया यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला असून शिवडी कोर्टाने तसे आदेश पारित केले आहेत, असे मलिक यांनी सांगितले.
मुश्रीफ यांच्यावरही केला होता आरोप
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही किरीट सोमैया यांच्याविरोधात कोल्हापूर कोर्टात दिवाणी व फौजदारी असे दोन्ही स्वरुपाचे दावे दाखल करण्याचे स्पष्ट केल्याचेही मलिक म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँड्रिंगद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप सोमैयांनी केला होता. या आरोपानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पत्रकार परिषद घेत सोमैया यांनी केलेले माझ्यावरील आरोप चुकीचे असून त्यांच्यावर 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हणाले होते.