मुंबई - माझ्यासह कुटुंबावर पाळत ठेवली जात आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांसह गृहमंत्र्यांना पत्र लिहिले असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (minister Nawab Malik) यांनी सांगितले आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'हे तर कारस्थान'
ते म्हणाले, की माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याबाबतीत जे कारस्थान करण्यात आले, तेच आपल्यासोबत करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. याचे पुरावे आपल्याकडे आहेत. या पाठीमागे काय मनिषा आहे? घाबरवण्यासाठी कोणी असे करत असेल तर आम्ही घाबरणारे नाहीत. ज्याला काही कोणाला कुठले रेकॉर्ड हवे असेल तर गुगलवर जावे. मात्र रेकी करण्याचे प्रकरण हे गंभीर आहे. तपास यंत्रणांनी यावर काम करावे. केंद्रीय तपास यंत्रणां(Central Investigative Agencies)चे काही अधिकारी आपल्याविरोधात लोकांना व्हाट्सअॅप(Whatsapp)द्वारे मसुदा तयार करून पाठवत आहेत. त्यांना ई-मेल (E-Mail) आयडी देत आहेत. त्यांना माझ्याविरोधात खोट्या तक्रार करण्यास सांगत आहेत.
'कारवाई करणार'
केंद्रीय यंत्रणा एका मंत्र्याला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चॅट्स जोडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पोलीस कमिश्नर यांना ते देणार आहे. आतापर्यंत अशा किती तक्रारी प्राप्त झाल्या, हे आरटीआयच्या माध्यमातून विचारणार आहे. कारवाई केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असेही ते म्हणाले. जे प्रश्न करीत आहेत, त्यांची औकात नाही. त्यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी करावी, असा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला.
'...तर सरकारला कर्ज काढावे लागेल'
कोणत्याही मंडळाला सरकारमध्ये समाविष्ट करणे शक्य नाही. एका मंडळाप्रमाणे इतर अनेक मंडळांनादेखील समाविष्ट करावे लागेल. सर्वांच्या वेतनाचा भार सरकारला सोसावा लागेल, कर्ज काढावे लागेल. प्रत्यक्षात ती व्यावहारिक बाब नाही. हे भाजपालादेखील माहीत आहे. मात्र आता एसटी कर्मचाऱ्यांच्यादेखील हे लक्षात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना योग्य वेतनवाढ दिल्याचे त्यांनी सांगितले.