मुंबई - विरोधकांकडून राज्य सरकार अस्थिर असल्याचा दावा केला जात असताना राज्यातल्या महाविकासआघाडी सरकारमधील नेत्यांच्या बैठकांचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा बंगल्यावर भेट घेणार आहेत.
मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यातील बैठकीचे कारण अद्याप समजू शकले नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची वर्षा निवसास्थानी गुरुवारी बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. तसेच कोरोना आणि टाळेबंदीवरही चर्चा झाली. या बैठकीसाठी काही मंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
या आठवड्यातील शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील आजची तिसरी भेट असणार आहे. मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गृहमंत्रालयाकडून केलेल्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या होत्या. यानंतर महाविकासआघाडीत तणाव वाढला होता. त्यानंतर शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची सोमवारी भेट घेतली.
मागील शुक्रवारीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे स्मारकात बैठक झाली होती. मंत्र्यांना न विचारताच टाळेबंदी कडक करण्याच्या निर्णयामुळे काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीचे मंत्री नाराज झाले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले होते. आज ठाकरे आणि पवार यांच्यातील बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हे आहेत शिवसेना व राष्ट्रवादीमधील मतभेदाची कारणे
- मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ३ दिवसांपूर्वी आपल्या अधिकारात १० उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या होत्या. त्या बदल्या तीन दिवसांमध्ये रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने हस्तक्षेप केल्याने राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
- दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडीने भाजप विरोधात राजकारण करत असताना शिवसेनेचे पारनेर येथील नगरसेवक राष्ट्रवादीकडून फोडले गेल्याने त्यावरील नाराजी मुख्यमंत्र्यांनी पवारांपुढे व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात लादण्यात आलेल्या टाळेबंदीवरूनही आघाडीत मतभेद वाढले आहेत.