मुंबई - पक्ष विलीनीकरणाची बातमी ही अफवा होती. ज्यांना वाटतं की आपण मित्रांसोबत एकत्र राहू नये अशांनी, काही पत्रकारांना सोबत घेऊन ही बातमी मुद्दाम पसरवली. ही बातमी साफ खोटी आहे. राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व कायम राहील, असे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीतील जय-पराजय आणि आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी पक्षातील दिग्गज नेत्यांनी यावर विचार मंथन केले.
यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. लोकसभा निवडणुकीत काय निकाल लागले ते डोक्यातून काढा. आपला पक्ष लोकांच्या प्रभावीपणे समोर कसा येईल, आपली विचारधारा लोक आपलीशी कशी करतील, हाच विचार करा, त्यासाठी प्रयत्न करा. आपण लोकसभा निवडणुकांप्रमाणे विधानसभेतही तरुण चेहऱ्यांना संधी देऊ, असेही शरद पवारांनी सांगितले.
एक वेळ अशी होती की, आपल्यासोबतचे ५८ लोक साथ सोडून गेले होते. सभागृहात आम्ही फक्त ६ जण होतो. मात्र, आम्ही मेहनत घेतली आणि पुन्हा ६० लोक सभागृहात आणले, त्यात सर्व नवे चेहरे होते. आजची निवडणुकीनंतरची परिस्थिती इतकी वाईट नाही. तुम्ही ४० लोक आहात, तुमचा ४० लोकांचा एक संच आहे. तुम्ही खंबीरपणे लढा, असे शरद पवारांनी म्हटले.
ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस पक्ष विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती.
निवडणूक यंत्रणेबाबत निवडणुकीत कधी नव्हे तितका विचार करण्यात आला. माझे मत हे बरोबर गेले, की नाही त्याबाबत लोकांना शंका वाटत आहे. देशात लोकांच्या मनात, अशी शंका याआधी कधी निर्माण झाली नव्हती. आजही लोकांची शंका कायम आहे.