मुंबई - संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात राज्यपालांनी तातडीने मदतीसाठी हस्तक्षेप करावा, आणि हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मिळवून द्यावी. तसेच, शेतकऱ्यांचे वीज बील, पीक कर्ज माफ करावे आदी मागण्या आम्ही राज्यपालांकडे केल्या असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली.
महाआघाडीच्या भेटीअगोदर भाजप नेते विनोद तावडे यांनीही राज्यपालांची भेट घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून सत्तास्थापनेच्या विविध पर्यायांबाबत त्यांनी राज्यपालांशी चर्चा केली. याबाबत विचारले असता, विनोद तावडे विधानसभेचे सदस्यही नाहीत, ते विधानसभेमध्ये मतही देऊ शकत नाहीत, तर ते काय चर्चा करणार? असे म्हणत अजित पवार यांनी तावडेंना टोला लगावला.
भाजपचे प्रमुख चंद्रकांत पाटील, किंवा विद्यमान मुख्यमंत्री अथवा शिवसेनेचे उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांशी चर्चा करण्याची गरज आहे. ते आले असते, तर आम्ही म्हणालो असतो, की सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली. तावडे हे कदाचित राज्यपालांना 'माझं तिकीट काहो कापलं?' असे विचारायला आले असतील, असे म्हणत पवारांनी तावडेंना चिमटा काढला.
हेही वाचा : शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात राष्ट्रवादीसोबत चर्चा नाही - बाळासाहेब थोरात