मुंबई - सकलांना मार्ग दाखवणारा अधिनायक, विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावे, अशी प्रार्थना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गणराया चरणी केली आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी ट्विट करून जगावरील हे कोरोना रुपी संकट दूर करण्यासाठीचे साकडे गणपती बाप्पाकडे घातले आहे.
ते म्हणतात की,"मनाला प्रसन्न करणारे श्रीगणेशाचे सर्वव्यापक आणि सर्वस्पर्शी रूप हे मानवासाठी सौख्याचे अधिष्ठान आहे. सकलांना मार्ग दाखवणारा अधिनायक, विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावे, ही श्रींचरणी प्रार्थना. सर्वांना श्रीगणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!'
श्रीगणरायांच्या आशीर्वादानं संपूर्ण महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल
यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ट्विट करून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "सर्वांना श्रीगणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आज, बाप्पांच्या आगमनानं घरोघरी आनंद, उत्साह, चैतन्य, भक्तीचं वातावरण निर्माण झालंय. यंदाचा गणेशोत्सव कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून साजरा होईल. श्रीगणरायांच्या आशीर्वादानं संपूर्ण महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे."
तसेच दुसऱ्या एका ट्विटमध्ये उपमु्ख्यमंत्री म्हणतात, " बुद्धीची देवता श्रीगणरायांच्या समस्त भक्तांनी गर्दी टाळून, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सण साधेपणानं साजरा करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. यामुळं राज्यातील कोरोना संसर्ग रोखला जाईल आणि बाप्पांच्या कृपेनं महाराष्ट्र लवकर कोरोनामुक्त होण्यास मदत होईल, अशी खात्री वाटते."