मुंबई - मुंबई ते गोवा जाणाऱ्या कार्डीला क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीने कार्यवाही करत बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांच्यासह आठ लोकांना अटक केली होती. कार्डीला क्रूझवर आर्यन खान असल्याने त्याच्यावर कारवाई झाली तशीच कारवाई क्रुझवरील इतरांवर का झाली नाही, तसेच या प्रकरणी पंचच आरोपीना पकडून आणत असल्याचे समोर आले आहे. यामुळे या प्रकरणी एनसीबीच्या एकूण कार्यवाहीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ही कार्यवाही संशयास्पद असल्याची प्रतिक्रिया मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायलयाचे वकिल, सरकारी वकील व कायदे तज्ज्ञ अॅड. नितीन सातपुते यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना दिली.
ड्रग्स पार्टीत सहभागी होणे हा गंभीर गुन्हा -
मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डिया द क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने २ ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास कारवाई करत १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस आणि २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त केली आहे. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा यांच्यासह एकूण आठ जणांना ७ ऑक्टोबरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आर्यन खानकडे ड्रग्स मिळाले नसल्याचे समोर आले तरीही तो जेलमध्ये असल्याचे समोर आले आहे. याबाबत अॅड. नितीन सातपुते यांना विचारले असता, आर्यन खानकडे ड्रग्स सापडले नाही. मात्र ड्रग्सचा साठा क्रूझवर पार्टी करणाऱ्या सदस्यांसाठी आणला होता. त्यासाठी प्रत्येक सदस्याकडून ८० हजार रुपये तिकीट घेण्यात आले होते. त्यात ड्रग्स, डान्स, खाण्या पिण्याचीही व्यवस्था होती. आर्यनने ड्रग्स आणले नाही, त्याच्याकडे ड्रग्स सापडले नाही तरी क्रूझवर असलेल्या लोकांच्या ताब्यात ड्रग्स होते. काहींनी त्याचा वापर केला असेल, काही त्याचा वापर करणार होते. ती जी पार्टी होती ती ड्रग्स पार्टी होती. यामुळे त्यात सहभागी होणे हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे. यामुळे आर्यनच्या ताब्यात ड्रग्स सापडले असेच गृहीत धरले जाणार आहे असे सातपुते यांनी सांगितले.
आर्यन प्रमाणे इतरांवर कारवाई का नाही ? -
क्रूझवरील ड्रग्स पार्टीत आर्यन खानसह शेकडो लोक सहभागी होते. अशा पार्टीत सहभागी होणे हा गंभीर गुन्हा आहे. त्याप्रमाणे आर्यन खानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारचा गुन्हा क्रूझवर पार्टीत सहभागी असलेल्या प्रत्येकावर का दाखल करण्यात आला नाही, असा प्रश्न सातपुते यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी आर्यन खान सह काही मोजक्या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. इतरांवर कारवाई केलेली नाही त्यांना सोडण्यात आले आहे. यामुळे ही कार्यवाही संशयास्पद आहे असे सातपुते म्हणाले. आर्यन खान गुन्हेगार आहे तर बाकीचेही लोकही गुन्हेगार आहेत. तुम्ही त्यांना सोडता आणि यांना जेलमध्ये ठेवता हे योग्य नाही. यावरून आर्यन खानला टार्गेट केले आहे असा याचा अर्थ होतो असे सातपुते म्हणाले.
हे ही वाचा - सुनावणीला काही तास शिल्लक असताना शाहरुख खानने आर्यनचा वकील बदलला
पंचांचे काम संशयास्पद -
एनसीबीची क्रुझवरील कार्यवाही ही गोपनीय होती. या कार्यवाहीमध्ये बाहेरच्या लोकांना सामील कसे गेले हा मोठा प्रश्न आहे. इतकी मोठी कार्यवाही करायची होती तर त्याची एनसीबीने आधीच तयारी का केली नाही. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आपली जास्त लोक का मागवून घेतली नाहीत, असे प्रश्न सातपुते यांनी उपस्थित केले आहेत. या कार्यवाहीत जे पंच आहेत तेच आरोपीना पकडून आणताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. वास्तविक पाहता पंचानी कार्यवाही करताना ती पाहायची असते. मात्र या ठिकाणी तर पंचच आरोपीना पकडून आणत आहेत. हे पंच त्याठिकाणी पार्टीत होते, ते त्या ठिकाणी कसे पोहचले ? ज्यांना एनसीबीने कारवाईत सामील करून घेतले ते सर्व एका ठरावीक राजकीय पक्षाचे लोक आहेत, यावरून हे सर्वच संशयास्पद असल्याचे सातपुते यांनी सांगितले.
हे ही वाचा - शाहरुख खानच्या मुलाचे कारागृहात हाल; आर्यन खानची प्रकृती बिघडण्याची चिंता!
काय आहे नेमके प्रकरण -
मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डिया द क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने २ ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास कारवाई करत १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस आणि २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा या आठ जणांना ताब्यात घेतले आहे. यामधील आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा या तीन जणांना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसाची एनसीबी कोठडी देण्यात आली होती. सोमवारी पुन्हा या तीन जणांना तसेच इतर पाच जणांना अशा एकूण आठ जणांना न्यायालयात हजर केले असता ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली होती. ७ ऑक्टोबरला आर्यन खानसह आठ आरोपीना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अद्याप २० जणांना अटक करण्यात आली आहे.