मुंबई - अभिनेता एजाज खान याला अमली पदार्थ तस्करी संदर्भात अटक करण्यात आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, टेलिव्हिजन ॲक्टर गौरव दीक्षित याच्या मुंबईतील फ्लॅटवर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ मिळाले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेल्या कारवाईदरम्यान हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये एमडी, एमडीएमए, चरस सारख्या अमली पदार्थांचा समावेश आहे.
गौरव दीक्षितने घटनास्थळावरून काढला पळ-
शुक्रवारी रात्री अंधेरीतील लोखंडवाला परिसरामध्ये असलेल्या गौरव दीक्षित याच्या फ्लॅटवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून छापेमारी करण्यात आली होती. यावेळेस गौरव दीक्षित हा घरी नव्हता. मात्र, या कारवाई दरम्यान गौरव दीक्षित इमारतीच्या खाली आला. मात्र घरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापेमारी केली असल्याचे कळताच त्याने घटनास्थळावरून पळ काढला.
बॉलीवूड व टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी-
दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अभिनेता एजाज खान याची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर अमली पदार्थ तस्कर शादाब बटाटा व शाहरुख खान या दोन अमली पदार्थ तस्करांची देखील चौकशी सुरू आहे. एजाज खान याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून बॉलीवूड व टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली जाते. यासंदर्भात काही सेलिब्रिटींना लवकरच एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स बजावले जाणार आहेत.
हेही वाचा- अँटिलिया स्फोटके प्रकरण: सचिन वाझेची 'एनआयए' कोठडी वाढवली