मुंबई - शहरात अमली पदार्थ तस्करीच्या विरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असताना मुंबईतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून करण्यात आलेल्या दोन ठिकाणच्या कारवाईमध्ये 9 किलो चरससह 436 एलएसडी ब्लॉट्स व 300 ग्राम गांजासह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे अटक करण्यात आलेला आरोपी हा एका निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे समोर आलेला आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरामध्ये छापा मारला असता या ठिकाणी श्रेयस केंजळे या अमलीपदार्थ तस्कराला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीमध्ये 436 एलएसडी ब्लॉट्स व 300 ग्राम गांजा जप्त करण्यात आलेला आहे. याबरोबरच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मुंबईतील दादर परिसरामध्ये करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान दोन मोटारसायकल जप्त करण्यात आलेल्या असून या 2 मोटरसायकलच्या माध्यमातून लपवण्यात आलेले 9 किलो चरस जप्त करण्यात आलेले आहे. मोटरसायकलमध्ये गुप्त पद्धतीने सदरचे अमली पदार्थ पेट्रोलच्या टाकीजवळ लपविण्यात आले होते. मोटरसायकलच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या राजेंद्र सिंग व गुरमीत सिंग या आरोपींचा शोध घेत आहे.