मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी अंमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याबाबत ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. समीर वानखेडे यांनी मालदीवला गेले असल्याचे मान्य केले, मात्र ते दुबईला कधी गेले नाहीत, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. मात्र, समीर वानखेडे हे दुबईलाही गेले होते, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करत एक फोटोही शेअर केला आहे.
हेही वाचा - सरकार जाणार म्हणून शाहरुख खानची वकिली स्वीकारली; चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिकांना टोला
समीर वानखेडे 10 डिसेंबर 2020 रोजी दुबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला. ट्विट केलेल्या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती समीर वानखेडे असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडे हे दुबईलाही गेले होते, असा आरोप त्यांच्याकडून नव्याने करण्यात आला आहे.
मालदीव, दुबई काय आहे प्रकरण?
मालदीव आणि दुबईला जाऊन बॉलिवुडच्या सेलिब्रेटींना टारगेट करून त्यांच्याकडून खंडणी वसूल केली जात होती, असा गंभीर आरोप समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केला आहे. या आरोपानंतर समीर वानखेडे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत नवाब मलिक पूर्णत: खोटे बोलत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही समीर वानखेडे म्हणाले.
हेही वाचा - राज्यातील नेत्यांचे नातेवाईक असलेल्या 'या' महिलांच्या मागे का लागलीय ईडी ?