मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (Narcotics Control Bureau) मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (NCB Sameer Wankhede) यांना अद्याप मुदतवाढ देण्यात आलेली नाही. समीर वानखेडे यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबरला संपणार आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळात कोणतीही मुदतवाढ दिली गेलेली नाही. समीर वानखेडे यांच्या कार्यकाळ संपण्यासाठी केवळ १३ दिवसांचा कालावधी उरला आहे. मात्र त्यांच्या मुदतवाढीचे कोणतेही संकेत आलेले नाही. त्यामुळे समीर वानखेडेंना खुर्ची रिकामी करावी लागणार का? आणि समीर वानखेडेंच्या ऐवजी एनसीबीच्या विभागीय संचालकाच्या जागी आता नवीन अधिकारी येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे समीर वानखेडे हे ३१ डिसेंबरपासून रजेवर जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
समीर वानखेडेंच्या कारकिर्दीचा घेतला आढावा -
समीर वानखेडे यांच्या कारकिर्दीचा आढावा देखील ब्युरोने (Narcotics Control Bureau ) घेतला आहे. समीर वानखेडे यांनी ऑगस्ट ते डिसेंबर 2020 दरम्यान 28 केसेस रजिस्टर केल्या आणि 96 गुन्हेगारांना अटक केली तर 2021 मध्ये 17 डिसेंबर पर्यंत समीर वानखेडे यांनी 117 केसेस दाखल केल्या आणि 234 गुन्हेगारांना अटक केली. त्यांनी तब्बल 1,000 कोटी रुपयांचे 1,791 किलो ड्रग्स जप्त केले तर तर 11 कोटी रुपयांची मालमत्ता गोठवली आहे.
एनसीबी आणि मुंबई पोलिसांनी विशेष पथके स्थापन करून आरोपांची चौकशी सुरू केली आहे. आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असतानाही वानखेडेंकडून ड्रग्ज तस्करांवर कारवाई सुरू आहे. त्यामुळे वानखेडे यांना मुदतवाढ मिळणार की, बदली होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुदतवाढ न घेण्याचा निर्णय -
गेले काही महिने समीर वानखेडे यांच्या विरोधात वाद सुरु आहेत. त्यामुळे या पदावर मुदतवाढ न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सुशांतसिंग राजपूतच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर ड्रग सिंडीकेट विरुद्ध सुरु झालेल्या कारवाईत वानखेडे सामील होते. या सिंडीकेटमध्ये अनेक बॉलीवूड कलाकार सामील असल्याचे पुरावे मिळाले आहेत. ऑक्टोबर मध्ये वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई किनाऱ्यावर एका क्रुझवर (Mumbai cruise drugs case) घातलेल्या धाडीत मादक पदार्थ मिळाले होते. त्यावेळी बॉलीवूड कलाकार शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्यासह ८ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले होते.
कोण आहेत समीर वानखेडे?
समीर वानखेडे 2008 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील IRS अधिकारी आहेत. भारतीय महसूल सेवेत येण्याआधी 2006 साली ते पहिल्यांदा केंद्र सरकारच्या सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये रूजू झाले होते. CPO मध्ये केंद्रीय गुप्तचर विभाग, सीबीआय, नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो, नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स, नॅशलन इनव्हेस्टिगेटिंग एजेंसी यांसारखे विविध विभाग येतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाची UPSC परीक्षा पास झाल्यानंतर समीर वानखेडे भारतीय महसूल सेवेत रुजू झाले. भारतीय महसूल सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांची नियुक्ती कस्टम विभागात करण्यात आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहायक आयुक्त म्हणून समीर वानखेडे यांनी काही वर्षं काम केलं.
कोणकोणत्या पदांवर काम -
2008 ते 2021 पर्यंत त्यांनी एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) चे उपायुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संयुक्त आयुक्त आणि आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
वर्ल्डकप ट्रॉफीही अडवली -
2013 मध्ये वानखेडेंनी गायक मिका सिंगला परदेशी चलनासह मुंबई विमानतळावर पकडले होते. अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय आणि राम गोपाल वर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालमत्तांवर त्यांनी छापे टाकले आहेत. 2011 मध्ये सोन्याने बनवलेल्या क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीला देखील कस्टम ड्यूटी भरल्यानंतरच मुंबई विमानतळावरून बाहेर पडण्याची परवानगी दिली होती.
डीआरआयमध्ये तैनात समीर वानखेडे यांना गेल्या वर्षी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये (Narcotics Control Bureau) पाठवण्यात आले आहे. आता समीर मुंबईत उपस्थित असलेल्या एनसीबी टीमचा एक भाग आहेत, जी सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास करत आहे.