मुंबई - माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला की, नवाब मलिक यांनी न्यायालयासमोर ज्या पॉवर ऑफ अॅटर्नीचा उल्लेख केला आहे, ती मुनिरा प्लंबर यांनी सही केलेली नव्हती. त्यामुळे ती पॉवर ऑफ अॅटर्नी ही बोगस असल्याचा युक्तिवाद अनिल सिंग यांनी आज मुंबई सत्र न्यायालयात केला आहे.
नवाब मलिक यांचे कनेक्शन डी कंपनीचे : आज झालेल्या युक्तीवादा दरम्यान ईडीच्या वतीने अनिल सिंग यांनी यापूर्वीचे सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे अनेक निर्णयाचा दाखला आज युक्तीवाद दरम्यान न्यायालयासमोर दिला आहे. नवाब मलिक यांचे कनेक्शन डी कंपनीचे असल्यामुळे मुंबईत डी कंपनीचे कारभार हसीना पारकर पहात होती. त्यांच्याच हस्ते हा व्यवहार झाला असल्याने हे प्रकरण दहशतवादी संघटनेला एक प्रकारे टेरर फंडिंग करणारं प्रकरण आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना जामीन देण्यात येऊ नये असे देखील अनिल सिंग यांनी म्हटले आहे. आज ईडीच्या वतीने नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज युक्तिवाद पूर्ण करण्यात आला असून 19 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
नवाब मलिक यांच्याविरोधात 5 हजार पानांचे आरोपपत्र : मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले असा दावा करत हे टेरर फंडिंग असल्याचा आरोप ईडीने केला आहे. 23 फेब्रुवारी रोजी सक्त वसुली संचालनालयाने नवाब मलिक यांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून ईडीने त्यांच्याविरोधात 5 हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले होते. सध्या नवाब मलिक यांच्यावर कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नवाब मलिक यांच्यावर काय आहे आरोप ? नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्यांच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.