मुंबई - केंद्रातील मोदी सरकारचा आज अर्थसंकल्प जाहीर झाला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. सर्वसामान्य जनतेचा खिसा कापणारा हा अर्थसंकल्प असल्याची जोरदार टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
'एक रुपया डिझेल आणि पेट्रोलवर कर लावून सर्वसामान्य जनतेचा खिसा कापणारा आणि टॅक्सवर कोणतीही सवलत न देणारा निराशाजनक अर्थसंकल्प' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.
"या बजेटच्या माध्यमातून जनतेला फक्त स्वप्न दाखवण्याचे काम केलेले आहे. गरिब व किसान यांच्या फक्त बाता असुन हातात मात्र काहीच नाही. बजेटमुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकरी निराश झाले असुन, निवडणुक काळात केलेल्या पोकळ घोषणांचे चटके आता नागरिकांना बसणार आहे." अशी तीव्र प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी 'इटिव्ही भारत' सोबत बोलताना दिली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज लोकसभेत २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. यात पेट्रोल व डिझेलवर एक्साइज ड्यूटी प्रतिलिटर एक रूपयाने आणि इन्फास्ट्रचर सेज प्रतिलिटर एक रूपयाने लावण्यात येणार आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रतिलिटर दोन रूपये प्रमाणे वाढ होऊन पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. या भाववाढीचा फटका निश्चितच सर्वसामान्यांना बसणार आहे.