मुंबई - सरकारने दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन केले तर लॉकडाऊनची आवश्यकता नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
देशाच्या काही भागात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. आपल्या राज्यात आजच्या घडीला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात जनतेला व सरकारला यश आलेले आहे. तरीपण लोकांनी गाफील राहू नये. जगात आणि देशात कोरोनाची लाट येवू शकते तर राज्यातही येवू शकते. त्यामुळे लोकांनी गर्दी टाळली पाहिजे, मास्क व सतत हात धुतले पाहिजेत. आपल्याकडे याशिवाय दुसरा पर्याय नाही असेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
दरम्यान, सकाळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहून कर्फ्यू अथवा लॉकडाऊन विषयी निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले होते. तर सायंकाळी सरकारने आज नवीन मार्गदर्शक सूचना जारी करून दिल्ली राजस्थान आणि भागातून येणाऱ्या प्रवाशांच्या निगेटिव्ह चाचण्या तपासून घेतल्या जाणार आहेत.