मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने राज्यात लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे. लॉकडाऊन हा राज्याला परवडणारा नाही. जनतेलाही तो परवडणारा नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. एकीकडे आरोग्य मंत्री राजेश टोपे लॉकडाऊन करण्याबाबत मत व्यक्त करत असताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधी दर्शवल्याने राष्ट्रवादीमध्ये एकमत नसल्याचे बोलले जात आहे.
लॉकडाऊन नको, आरोग्य सुविधा वाढवा -
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लॉकडाऊन बाबतची राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनचा विचार आला आहे. मात्र, लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. कारण लॉकडाऊन हा राज्याला पुन्हा परवडणारा नाही. जनतेलाही परवडणारा नाही. त्यामुळे पर्याय होऊ शकत नाही. त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात यावा अशी आमची भूमिका आहे. तसा आग्रहच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आला आहोत, असे नवाब मलिक यांनी सांगितले. लोकांनी अजून काळजी घेतली पाहिजे. नियम पाळल्यास कोरोना वाढणार नाही, असेही मलिक म्हणाले.
निर्बंध पाळणार नसतील तर लॉकडाऊन -
राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा, असे मत टास्क फोर्सच्या बैठकीत मांडण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी. खासगी कार्यालये व आस्थापना ५० टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला केल्या आहेत.
राष्ट्रवादीमध्ये मतमतांतरे -
मुंबई, पुणे, नागपूर या तीन शहरात सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लोकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत नसल्याचे दिसून येते, असे बोलले जात आहे.