मुंबई - पेगॅससने सॉफ्टवेअर स्पायवेअरच्या मदतीने जगभरातील आणि भारतातील काही लोकांचे फोन हॅक केल्याचे वृत्त समोर आले आहे. या मुद्द्यावर आज अधिवेशनात पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक झाले होते. तर राज्यात देखील याबाबत तिखट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
'फोन हॅक करुन पाळत का ठेवली?'
भारतातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, न्यायाधीश आणि उद्योगपती यांच्यावर पेगॅससच्या माध्यमातून पाळत ठेवून फोन हॅक करण्यात आल्याची बाब गंभीर असून याप्रकरणाची चौकशी करून जो जबाबदार असेल त्याच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
नवाब मलिकांचा पंतप्रधान मोदींना सवाल
इस्त्रायलमधील सॉफ्टवेअर एजन्सीने आमचे सॉफ्टवेअर फक्त सरकारलाच विकत असल्याचे स्पष्ट केले आहे. खाजगी लोकांना नाही. जर खाजगी लोकांना विकण्यात आले नाही. तर केंद्रसरकारच्या कुठल्या एजन्सीने देशातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, न्यायाधीश, उद्योगपती यांचे फोन हॅक करुन पाळत ठेवली, असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान, केंद्रसरकारच्या माहितीसाठी हे करण्यात आले असेल तर कुठल्या अधिकार्याने किंवा एजन्सीने फोन हॅक करुन पाळत ठेवली याचे उत्तर मोदी सरकारने जनतेला दिले पाहिजे असेही नवाब मलिक म्हणाले.