मुंबई - मुख्यमंत्र्यांच्या घरात जाऊन हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa At Matoshree ) पठण करू असे आवाहन देणारे खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) हे तुरुंगात असताना, ते रहात असलेल्या घराला पालिकेने नोटीस बजावली ( BMC Notice To Navneet Rana Home ) आहे. यामुळे राणा दाम्पत्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली ( Illegal Construction At Navneet Rana Home ) आहे. आज पालिकेचे पथक त्यांच्या घरी गेले असता, घर बंद असल्याने पथकाला परत फिरावे लागले ( BMC Team At Navneet Rana Home ) आहे.
पालिकेची नोटीस - खार पश्चिम, १४ व्या रस्त्यावर 'लाव्ही' इमारतीत राणा दाम्पत्य यांचे घर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा वाचण्यास जाण्यासाठी हे दांपत्य मुंबईत आले तेव्हा याच इमारतीत उतरले होते. या इमारतीत तसेच काही घरांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरीक्त अधिक बांधकाम करण्यात आले असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पालिका नियमांचे उल्लंघन केले असल्याच्या तक्रारीवरुन मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार नोटीस पाठवली आहे. इमारतीतील अनेक घरांमध्ये अवैध बांधकामे करण्यात आली असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. काही घरांना या आधी नोटिसा पाठवल्या आहेत. राणा दाम्पत्याच्या घरालाही नोटीस पाठवली होती. त्यानुसार आज पालिकेचे पथक त्यांच्या घरी गेले. राणा कुटूंबीय घरी नसल्याने दरवाजा उघडला नसल्याने पालिकेचे पथक परत फिरले आहे. यानंतर ज्यावेळी राणा कुटूंबीय कळवतील त्यानंतर आम्ही पुन्हा तपासणीला येऊ अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
हनुमान चालीसा प्रकरण - मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या "मातोश्री" या बंगल्यावर जाऊन हनुमान चाळीसा पठण करू असे आवाहन राणा दाम्पत्याने दिले होते. त्यानंतर मुंबईत दोन दिवस वातावरण तापले होते. या प्रकरणी राणा दाम्पत्यांला पोलिसांनी अटक केली असून ते गेले बारा दिवस तुरुंगात होते. आजच त्या दोघांनाही जामीन मिळाला आहे.