मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. सगळ्यात पहिले नाशिकमधून पडसाद उमटले होते. यावेळी नाशिकमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. त्या कार्यकर्तांविरोधात नाशिकमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. नाशिक पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, त्या फरार शिवसैनिकांनी खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे.
कार्यकर्त्यांनी घेतली राऊतांची भेट -
नाशिकमध्ये भाजपा कार्यालयाच्या तोडफोडीप्रकरणी दहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचसोबत ज्या शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचा शोध नाशिक पोलीस घेत आहेत. यापैकी काही फरार कार्यकर्त्यांनी आज (शुक्रवार) संजय राऊत यांची भेट घेतली. फरार कार्यकर्त्यांनी राऊत यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करणार -
याबाबत बोलताना संजय राऊत यांनी असे म्हटले की, ज्या फरार शिवसेना कार्यकर्त्यांचा शोध नाशिक पोलिसांकडून घेतला जात आहे ते आज निवासस्थानी येऊन भेटले. या कार्यकर्त्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - नाशिक भाजप कार्यालयावर हल्ला करणारे संशयित संजय राऊत यांच्यासोबत; अटक करण्याची मागणी