मुंबई - राज्य सरकार अस्तित्वात आहे, असे राज्यात वाटत नाही. दरवर्षी पाऊस पडतो. आज पाऊस पडला तर मंत्रालयाला सुट्टी दिली. असेही कोण त्यात बसत नसेल तर मंत्रालय बंद करा, असे म्हणत खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला.
कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची राज्यात सर्वाधिक संख्या आहेत. त्याबाबत बोलताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे म्हणाले, की मुंबईत आतापर्यंत 6 हजार 490 लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर सरकार का बोलत नाही? महाराष्ट्राचं सरकार कोरोनामुळे मृत्यूमध्ये एक नंबरवर आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सामनाला मुलाखत दिली होती. त्यावरूनही भाजपचे नेते राणेंनी टीका केली. खासदार राणे म्हणाले, की सामनातून कशाला मुलाखत देता ? त्यांची माणसे आता कोणी बोलत नाहीत. व्हिडिओ कॉन्फरन्सवरून एका जागेवर काम करत आहेत. राज्यातील अधिकारी काय करतात याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष नाही.
अमृता फडणवीस यांनी सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणावरून मुंबई पोलिसांवर टीका केली होती. त्यावरून त्यांच्यावर सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी टीका केली. त्याबाबत बोलताना राणे म्हणाले, की त्यांच्यावरील टीकेला मी उत्तर देतो. वरुण सरदेसाई हे ठाकरे यांचे नातेवाईक आहेत. ते राजकारणात कधी आले माहीत नाही. आता खासदार झालेले आणि नातेवाईक चमचेगिरी करतात. असे करू नका. अन्यथा त्यांच्या कुंडल्या काढाव्या लागतील. सरदेसाई अजून लहान आहेत. नाही तर तोंड आम्हाला बंद करता येईल, असा इशाराही राणेंनी दिला.
पुढे राणे म्हणाले, की शिवसेनेतील जुने गेले आणि नवीन कलेक्टर आले आहेत. कोकणात जाण्यासाठी नको त्या अटी शर्ती घालू नये. त्यांना क्वारनटाईन करू नये. एकतर मदत करत नाहीत. पुन्हा निर्बंध लावता हे चुकीचे आहे. अनिल परब कोण आहेत? त्यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नीवर टीका केली आहे. त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, अशी राणेंनी टीका केली.