मुंबई - शिवसेना कार्यप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी शनिवारी मुंबईतील बीकेसी येथे जाहीर शिवसंपर्क सभा घेतली. मात्र, ही सभा फेरीवाल्यांनी जमवलेल्या गर्दीची होती. पस्तीस हजारांपेक्षा अधिक लोक या सभेला नव्हते, असा दावा केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी ( Narayan Rane Criticized CM Uddhav Thackeray ) पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी नारायण राणे यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात सगळे विषयी छापून आलेल्या लेखाची चिरफाड केली. सामनामध्ये अतिशय बोगस आणि धादांत खोटे असे लिहिले गेले आहे. कुठलीही गर्जना आणि सडेतोड विचार या भाषणामध्ये मिळाले नाहीत. अतिशय नीरस, अशी ही सभा झाल्याचे राणे यांनी म्हटले.
कुणाच्या चुली पेटल्या दाखवा - यावेळी बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेने आम्ही घर पेटवणारे नाहीतर चुली पेटवणारे असल्याचे म्हटले आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये शिवसेनेने किती रोजगार निर्मिती केली आणि किती लोकांच्या चुली पेटवल्या याची आकडेवारी दाखवावी, असे आव्हान यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.
बाबरी ढाचा पडताना उद्धव कुठे होते - बाबरी मशिदीचा ढाचा शिवसैनिकांनी पाडला की नाही याबाबत संदिग्धता व्यक्त करताना शिवसैनिक ढाचापर्यंत पोहोचले होते. हे मात्र राणे यांनी यावेळी कबूल केले. मात्र, उद्धव ठाकरे बाबरी पडली तेव्हा कुठेही नव्हते, असा दावा नारायण राणे यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे हे केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे काम करणारे मंत्री आहेत. त्यामुळे राज्याचा विकास होत नाही. राज्यांमध्ये शिवसेनेने भ्रष्टाचार केला असून यशवंत जाधव यांच्या माध्यमातून तो जनतेसमोर आले आहे. शिवसेनाही दाऊद इब्राहिमची संबंधित असलेल्या नवा भाई यांना भाई म्हणते पण राज ठाकरेला मात्र मुन्नाभाई चिडवतात, येते असेही ते म्हणाले.
शिवाजी महाराजांच्या नावावर शिवसेनेची दुकानदारी - शिवसेना ही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आपली दुकानदारी गेल्या अनेक वर्षांपासून चालवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य कारभाराविषयी आणि तत्वांविषयी काहीही पडलेले नाही, असा आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला.