मुंबई - आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आम्हाला फसवले आहे. पोलिसांनी आम्हाला 9 तास चौकशीसाठी बसवलं. तसेच मी केंद्रीय मंत्री असून नितेश आमदार आहे. त्यामुळे कोणावर अन्याय झाला तर आवाज उठवणं आमचे काम असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र किशोरी पेडणेकरांनी दिशा सालियनच्या आई-वडिलांना खोटी तक्रार दाखल करण्यास प्रवृत्ती केले असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांची चौकशी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शेवटी अमित शहांना केला फोन -
पोलिसांनी दोघांचेही बयान नोंदवले. जवळपास नऊ तास पोलीस ठाण्यात बसवण्यात आले. आम्ही आमची बाजू पोलिसांसमोर ठेवली. मात्र आम्हाला पोलिसांनी लवकर सोडले नाही. त्यामुळे शेवटी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर थोड्या वेळात सोडण्यात आले, अशी माहिती राणे यांनी दिली.
दिशाच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांचे दोनदा फोन -
सुशांत आणि दिशाच्या मृत्यूनंतर मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोनदा फोन आला. ते म्हणाले, त्याठिकाणी मंत्र्यांची गाडी होती असे बोलू नका. त्यावर आम्ही लोकप्रतिनिधी आहे, बोलण्याचा अधिकार आहे असे मी म्हणालो. मात्र उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्हालाही दोन मुलं आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतचे हे संभाषण मी पोलिसांना सांगितले. मात्र त्यांनी ते नोंदवले नाही. वारंवार सांगूनही त्यांनी ते बयान घेतले नाही, असेही नारायण राणे यांनी सांगितले. आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न असून आम्ही दबावाला बळी पडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.