मुंबई काँग्रेस नेते राहुल गांधी ( Congress leader Rahul Gandhi ) यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष करावे, असा ठराव काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने एकमताने पारित केला. परंतु या ठरावाला पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan ) यांनी विरोध केल्याचं समजत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांची वर्णी लागणार असून सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाय उतार व्हावे लागणार आहे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
पृथ्वीराज चव्हाण नाराज नाहीत काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष पदी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची निवड करण्यात यावी असा ठराव काल एकमताने काँग्रेस प्रदेश कमिटीने मंजूर केला, पण याला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केल्याचे समजत आहे. या विषयावर बोलताना नाना पटोले म्हणाले की या बाबत कुणीही विरोध केला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा हात उंचावून ठरावाच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे अशा बातम्या निराधार आहेत. काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड ही निवडणुकीने व्हावी, अशी इच्छा स्वतः राहुल गांधी यांनी व्यक्त केली असताना पाच राज्यांनी असा ठराव केल्याने यावर चर्चा होऊ लागली आहे. तसेच काँग्रेस नेते शशी थरूर व अशोक गेहलोत हे सुद्धा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे समजत आहे. परंतु यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की ही त्यांची इच्छा आहे, त्यांना वाटल्यास ते निवडणूक लढवू शकतात.
प्रदेशाध्यक्षपद बदलीची चर्चा व्यर्थ ? काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण यांच्या नावाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मध्यंतरी अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने सुद्धा त्या चर्चा रंगल्या होत्या, अशात आता अशोक चव्हाण यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना प्रदेश अध्यक्षपदी विराजमान केले जाणार आहे. असे समजते यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की चर्चा निराधार आहेत. प्रदेशाध्यक्ष पदी अजून तरी कुठल्याही नावाची चर्चा नाही. तसेच अशोक चव्हाण हे सुद्धा नाराज नाहीत. त्याचबरोबर आतापर्यंत पक्षाने मला ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्या मी इमाने इतबारे पार पाडल्या, असून यापुढेही पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पूर्णपणे पार पाडेन. पण सध्यातरी अशी कुठली चर्चा नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.
काँग्रेस एक नंबरचा पक्ष होईल सध्या राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष ठरला, असून महाविकास आघाडीतील एक असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दोन नंबर वर आहे. व महाविकास आघाडीत असताना एकनाथ शिंदे यांना हीच भीती होती. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरचढ होत आहे, म्हणून त्यांनी शिवसेना सोडून शिंदे गटाची स्थापना केली. यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आम्हाला सुद्धा या निवडणुकीत १७५ जागा भेटल्या आहेत. ही आकडेवारी कुठून आली माहित नाही. ग्रामपंचायात निवडणुका या चिन्हावर लढवल्या जात नाहीत, म्हणून आता पुढे ज्या निवडणुका पक्ष चिन्हावर होतील. त्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष राहील, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.