मुंबई - महाराष्ट्र काँग्रेसने देशभरात कोरोना पसरवल्याचा आरोप (Maharashtra Congress Spread Corona) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. हे विधान महाराष्ट्राची बदनामी करणारे आहे. त्यामुळे याविरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी पत्रांचा भडीमार करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.
- काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत भाषण करताना म्हणाले होते की, कोरोना कालावधीत महाराष्ट्र काँग्रेसने परप्रांतियांना महाराष्ट्राबाहेर पाठवून देशभरात कोरोना पसरवला व महाराष्ट्रावरचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न केला. यावर नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्राने केलेल्या मदतीची अशाप्रकारे खिल्ली उडवत राज्याचा अपमान केल्याबद्दल भाजपाने जाहीर माफी मागावी अशी आमची मागणी आहे. मात्र, भाजपाला ती ऐकू येत नाही, त्यामुळे आता फडणवीसांच्या घरी पत्रे पाढवून माफी मागण्याची मागणी करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत सांगितले.
- शिवजयंतीपर्यंत करणार पत्रांचा भडीमार -
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची बदनामी केल्याबद्दल माफी मागावी, यासाठी त्यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवरायांच्या जयंतीपर्यंत पत्रे पाठवण्यात येणार आहेत. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची बदनामी केल्याबाबत असा मजकूर या पत्रात असणार आहे, असे नाना पटोले म्हणाले.
- पुरोहित आणि फडणवीस यांची भेट दिशानिर्देशक -
कर्नल पुरोहित यांनी एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले की, या दोघांची भेट आणि हस्तांदोलन यावर अधिक काही बोलणार नाही, मात्र हे दिशानिर्देशक चिन्ह आहे.