मुंबई - आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातवाचे नामकरण करण्यात आले. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी पुत्ररत्न प्राप्त झाले होते. राज ठाकरे यांचे दादर येथील निवासस्थान असलेल्या 'शिवतीर्थ' येथे नवजात बालकाचा नामकरण सोहळा पार पडला.
आजोबांनी ठेवले बाळाचे नाव - मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी सोशल मीडिया पोस्टाद्वारे दिलेल्या माहितीनुसार या नवजात बाळाचे नाव आजोबांनी म्हणजेच राज ठाकरे यांनी ठेवले आहे. त्यांनी हे नाव 'किआन' असे ठेवले आहे. या नावाचा अर्थ देवाची कृपा असा होतो. या खास सोहळ्याला कुटुंबातील काही जवळचे नातेवाईक आणि जवळचे मित्रच उपस्थित होते. सोहळ्यासाठी संपूर्ण घर फुलांनी सजवले आहे. लाऊडस्पीकरची रांग आणि अयोध्या भेटीमुळे चर्चेत आलेल्या राज ठाकरेंच्या घरी होणाऱ्या या सोहळ्याची मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे.
बारशाचे महत्व - हिंदू धर्मात मुलाचे नाव ठरवण्याच्या दिवसाला (बारसं) विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार मुलगा किंवा मुलगी जन्मल्यानंतर 11 व्या, 12 व्या आणि 16 व्या दिवशी नामकरण विधी केला जातो. मुलाच्या नावात नेहमी अर्थ असणे महत्वाचे आहे. नावाचा मुलाच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत राहतो. म्हणून, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की मुलाचे अर्थपूर्ण नाव असावे.