मुंबई - गेल्या पावसाळ्यात (५ ऑगस्ट २०२०) दक्षिण मुंबईतील मलबार हिल, बाबुलनाथ जंक्शन परिसरातील एन. एस. पाटकर मार्गालगतचा टेकडीचा भाग खचला होता. त्यानंतर येथे संरक्षक भिंत बांधण्यासह रस्त्याचे कामही पालिकेने पूर्ण केले आहे. हे काम अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण झाले आहे. या रस्त्याचे पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर यांची उपस्थिती होती.
टेकडीचा भाग ढासळला होता
मुंबईत (५ ऑगस्ट २०२०) रोजी अतिवृष्टी झाली होती. या दिवशी महानगरपालिकेच्या 'डी' विभाग कार्यक्षेत्रातील मलबार हिल परिसरात जोरदार पाऊस झाला होता. या पावसामुळे दक्षिण मुंबई परिसरातील एन. एस. पाटकर मार्गाला लागून असणारा टेकडीच्या उताराचा भाग ढासळला होता. यामुळे टेकडीवरुन जाणारा बी. जी. खेर मार्ग देखील प्रभावित होऊन धोकादायक झाला होता. या दोन्ही मार्गांवरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव तत्काळ बंद करण्यात आली होती. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या नेतृत्वात एन. एस. पाटकर मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरु होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व कार्यवाही सुरू आहे.
६ महिन्यांत काम पूर्ण
टेकडीचा भाग खचल्यानंतर भारतीय तंत्रज्ञान संस्थान आय. आय. टी. मुंबई यांच्या सहकार्याने तज्ज्ञ समिती नियुक्ती करण्यात आली. सदर सल्लागारांच्या सुचनांची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन, कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. टेकडीच्या उतारालगत व एन. एस. पाटकर मार्गालगत मलबार हिलच्या बाधित भागाचे बळकटीकरण करणे, या ठिकाणी संरक्षक भिंत उभारणे आणि रस्त्याखाली पर्जन्य जलवाहिनी बांधण्यासह रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू केले. हे काम काम (१ जानेवारी २०२१)पासून सुरू करण्यात आले. त्यानंतर आता केवळ ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत सदर काम पूर्ण करण्यात आले असून, आज (२४ जून)ला हा रस्ता सुरू करण्यात आला आहे.
या कामाचा समावेश
या कामात ५ मीटर उंचीची व १६० मीटर लांब संरक्षक भिंत बांधण्याचे काम करण्यात आले आहे. या संरक्षक भिंतीची स्थापत्तीय वैशिष्ट्य म्हणजे सदर भिंतीची जाडी ही खालच्या बाजूला ९०० मिली मीटर असून वरच्या बाजूला ३०० मिली मीटर इतकी आहे. या भिंतीलगत असणाऱ्या सुमारे ५५० मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. तसेच, रस्त्याच्या खाली १२०० मिली मीटर व्यासाची व सुमारे ५५० मीटर लांबीची पर्जन्य जलवाहिनीही टाकण्यात आली आहे. या रस्त्याची रुंदी ही पूर्वी सुमारे २४ मीटर इतकी होती. ती वाढून आता २७ मीटर इतकी झाली आहे. सदर कामामध्ये संरक्षक भिंत बांधणे, रस्त्याखाली पर्जन्य जलवाहिनी बांधणे आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, या प्रमुख कामांचा समावेश होता.