अमरावती - अमरावती शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या काळात बंधुभावाचा संदेश देणारा एक प्रकार देखील उजेडात आला आहे. शहरातील हबीब नगर भाग दोनमध्ये असणाऱ्या महादेव मंदिराच्या रक्षणासाठी परिसरातील मुस्लीम बांधव धावून आले. शहरात सामाजिक आणि धार्मिक एकता टिकून रहावी यासाठी परिसरातील प्रत्येक व्यक्ती मंदिराची सुरक्षितता ही आपली जबाबदारी माणून मंदिराचा पाहरेकरी झाला.
हेही वाचा - सोमैयांनी अमरावतीत येऊन आमचा जिल्हा भडकू नये - मंत्री यशोमती ठाकूर
रात्रभर जागून केले जात आहे मंदिराचे संरक्षण
शहरात समाजकंटकांनी दोन समुदायात तेढ निर्माण होईल, अशा स्वरुपाचा प्रकार केला होता. असे असताना मुस्लीमबहुल परिसर असणाऱ्या हबीब नगर नंबर 2, या परिसरात असणाऱ्या महादेव मंदिरावर शनिवारी काही समाजकंटकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिसरातील मुस्लीम बांधवांनी समाजकंटकांच्या जमावाला परतावून लावले. मंदिरापर्यंत कोणी समाजकंटक पोहोचू नये यासाठी तार आणि लोखंडाचे फाटक मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर लावण्यात आले. रात्रीच्या अंधारात समाजकंटकांपासून मंदिर सुरक्षित रहावे यासाठी मंदिरालगतच शेकोटी पेटवून कडाक्याच्या थंडीत मुस्लीम बांधवांनी जागरण करून मंदिराचे संरक्षण करून धार्मिक एकात्मतेचा आदर्श प्रस्थापित केला.
हबीब नगरवासियांनी दिला बंधुत्वाचा संदेश
राजकीय मंडळी आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अमरावती शहरातही असाच प्रकार घडला आहे. असे असले तरी आपण माणसे आहोत. एकमेकांमध्ये तेढ निर्माण होईल, असे कृत्य होऊ नये हाच आमचा उद्देश आहे. यामुळेच आमच्या परिसरात असणाऱ्या महादेव मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी ही आमचीच असल्याचे या भागातील रहिवाशांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले. एकूणच हबीब नगरवासियांनी मंदिराचे रक्षण करून सामाजिक एक्याचा संदेश दिला.
बातमी तारीख - दि. 15 नोव्हेंबर 2021
हेही वाचा - Amravati Violence : नवाब मलिकांनी आरोप सिद्ध करून दाखवावे अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार - अनिल बोंडे