मुंबई - ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रवण राठोड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील माहीममधील रुग्णालयात उपचारही सुरू होते, मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले.
'आशिकी'पासून बॉलिवूडमधील टॉपचे संगीतकार
नदीम-श्रावण यांनी अनेक श्रवणीय गाणी देऊन रसिकांना गोड भूरळ पाडली होती. ‘९० साली प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ पासून ते बॉलिवूडमधील टॉपचे संगीतकार द्वयी बनले. त्यानंतर आलेल्या ‘साजन’, ’दिल हैं के मानता नहीं’, ‘सडक’, राजा हिंदुस्थानी’, ‘परदेस’ सारख्या असंख्य चित्रपटांना त्यांनी हिट संगीत दिले आणि बॉलिवूड गाजविले. मात्र, गुलशन कुमार यांच्या हत्येत नदीमचा हात आहे. या झालेल्या आरोपामुळे नदीम लंडनला निघून गेला. त्यानंतरही श्रावण यांनी नदीमची साथ सोडली नाही आणि त्यांनी दुबईत भेटत आपली गाणी कंपोझ करणं सुरूच ठेवले. २००५ साली ही जोडी तुटली. श्रवण यांनी स्वतंत्रपणे मराठी चित्रपट ‘ई-मेल फेमेल’ साठी एक ‘आयटम सॉंग’ संगीतबद्ध केले होते. त्यांची मुलेही संगीतकार असून बॉलिवूडमध्ये संगीतकार-द्वयी संजीव-दर्शन म्हणून प्रसिद्ध आहेत.
नदीम आणि श्रवण यांचे सूर जुळले कारण दोघांनाही ‘मेलडी’ खूपच पसंत होती. त्यामुळेच त्यांच्या गाण्यात मधाळ गोडवा असे. बऱ्याच वर्षांपूर्वी एक आख्यायिका ऐकायला मिळाली होती. ती म्हणजे नदीम-श्रवण यांना ब्रेक मिळायच्या आधीच त्यांच्याकडे बऱ्याच गाण्यांची बँक होती. ते मोठमोठ्या निर्मिती संस्थांना भेटायला जायचे व आपल्या ट्यून्स ऐकवायचे. एकदा एका मोठ्या बॅनरचा मोठा चित्रपट त्यातील संगीतामुळे हिट ठरला आणि नदीम-श्रवण यांना जाणवले की त्यातील बहुसंख्य गाणी त्यांनी तयार केलेली आहेत. परंतु ते नवीन असल्यामुळे आणि समोरील निर्माते खूप प्रतिष्ठित असल्यामुळे ते काहीच करू शकले नाहीत. नंतर ‘आशिकी’ गाजला आणि त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. परंतु ‘त्या’ निर्मितीसंस्थेसोबत त्यांनी कधीच काम केले नाही.
'आशिकी' हा त्यांच्या करियरमधील सर्वश्रेष्ठ चित्रपट
लोकप्रिय संगीतकार नदीम-श्रावण जोडीने दिल है के मानता नहीं, साजन, सडक, दिवाना आणि परदेस हे त्यांच्या उत्कृष्ट कामांपैकी गाजलेले काही चित्रपट आहेत. १९९० मध्ये रिलीज झालेला 'आशिकी' हा त्यांच्या करियरमधील सर्वश्रेष्ठ चित्रपट होता.
श्रवण राठोड यांच्या निधनाने बॉलिवूड आणि संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - राज्यात 67 हजार 013 नवे कोरोनाग्रस्त, 568 जणांचा मृत्यू
हेही वाचा - मुंबईत चौथ्या दिवशी रुग्णसंख्या 7 हजाराच्या घरात, 75 रुग्णांचा मृत्यू