मुंबई - रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास कायद्याने मनाई करण्यात आली आहे. मात्र, नियम धाब्यावर बसवून फेरीवाल्यांनी आपले बस्तान कायम ठेवले आहे. रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर आता कारवाई केली जाणार आहे. पालिका, रेल्वे आणि पोलिसांमार्फत आता संयुक्त कारवाई सुरू करण्यात येणार आहे. याबाबत मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईचा आढावा घेण्यासाठी एक महिन्यांनंतर पुन्हा बैठक घेतली जाणार आहे.
कारवाई कायम ठेवणार
रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटर आणि शाळेपासून १०० मीटरच्या अंतरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मनाई करण्यात आली आहे. मात्र या नियमाकडे दुर्लक्ष करून फेरीवाले रेल्वे परिसरातील पदपथ, स्कायवॉक, पादचारी पूलावर सर्रास व्यवसाय करीत आहेत. मोकळ्या जागा अडवल्या जात असल्याने नागरिकांना कसरत करून चालावे लागते आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर हे प्रमाण आणखी वाढले आहे. त्याचा फटका पादचारी आणि प्रवाशांना बसत आहे. परिणामी स्थानक परिसरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढते आहे. रेल्वे प्रशासनामार्फत रेल्वे परिसरातील ही कारवाई केली जाते. मात्र, अपुऱ्या यंत्रणेमुळे गेल्या दोन वर्षांपासून ही कारवाई थंडावली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी मंगळवारी मुंबई महापालिका, रेल्वे, पोलिस अधिकारी, व्यापारी आणि फेरीवाला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.
50 प्रतिनिधींची उपस्थिती
सुमारे ५० प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती व्यापारी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. 'पोलिसांच्या मदतीने स्थानक परिसर मोकळा ठेवण्यासाठी तत्काळ कारवाई सुरू करण्याचे निर्देश पोलिस आयुक्तांनी बैठकीत दिले आहेत. पालिका आपल्या हद्दीतील कारवाई कायम ठेवेल. अशी माहिती पालिकेच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी दिली. वाहतूक पोलिस व फेरीवाला संघटनांनी या कारवाईला सहकार्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी फेरीवाला संघटनांनी फेरीवाला धोरण, व्यवसायाच्या जागा आणि शहर फेरीवाला समितीची अद्याप पालिकेमार्फत अंमलबजावणी झाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला, अशी माहिती कामगार नेते व मुंबई हॉकर्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिली.
आधी जागा निश्चित करा
या कारवाईला मुंबई हॉकर्स युनियनने विरोध केला आहे. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईत एक लाख फेरीवाले असल्याचे म्हटले असले तरी ही संख्या अडीच ते तीन लाखांपर्यंत आहे. या फेरीवाल्यांना आधी व्यवसायाच्या जागा निश्चित कराव्यात, त्यानंतर कारवाई सुरू करावी. २०१४ नंतर पुन्हा सर्वेक्षण झालेले नाही. ते तातडीने सुरू करावे. रेल्वे स्थानक परिसराबाहेर भाजी, फळ विक्रेते अशा जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे फेरीवाले आहेत. हे फेरीवाले ही सामान्य मुंबईकरांची गरज आहे, असे शंशाक राव यांनी सांगितले.
हेही वाचा - SPECIAL : अंधेरी आरटीओत रिक्षा परवाना घोटाळा; चोराला सोडून संन्याशाला फाशी!