मुंबई - मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार होता. या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून शाळा सुरु झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता व शिक्षकांचे शैक्षणिक कौशल्य ( BMC School Student Teacher Evaluation ) तपासले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. महापालिकेतील शाळांचा शैक्षणिक दर्जा आणखी उंचावण्यासाठी याचा उपयोग होणार असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
विद्यार्थी आणि शिक्षकांचे मूल्यांकन : जगभरात हाहाकार पसरवणाऱ्या कोरोना विषाणूने मुंबईत मार्च २०२० मध्ये प्रवेश केला. त्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या. गेल्या दोन वर्षात विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत होते. दोन वर्षात परीक्षा झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांची आकलन क्षमता किती आहे. ते दोन वर्षानंतर शाळेत आल्यावर जे शिकवले जाते, त्याचे आकलन करू शकत आहेत का याची माहिती होणे गरजेचे आहे. विद्यार्थी आकलन करण्यात कमी पडत असल्यास त्यांच्यात सुधारणा करणे शकय होणार आहे. तसेच शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवले जात आहे. मात्र दोन वर्षाचा कालावधी गेला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शिकवले पाहिजे. विद्यार्थ्यांना विषय सहज समजला पाहिजे. यासाठी शिक्षकांचेही मूल्यांकन केले जाणार आहे. त्यासाठी जुलै महिन्याच्या शेवटी विद्यार्थी आणि शिक्षक यांची परीक्षा घेतली जाणार आहे. अशीच परिक्षा सहा महिन्यांनी पुन्हा घेतली जाणार आहे, असे पालिकेचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी सांगितले.
दर्जा उंचावण्यासाठी उपाययोजना : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा घसरत चालल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ लागली होती. खासगी शाळांकडे ओढा असल्याची दखल घेत पालिकेने शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले आहे. पालिकेने खासगी शाळांना टक्कर देण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु केल्या आहेत. पालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई, आयसीएसई, केंब्रिज, आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सुरू केले आहेत. पालिका शाळांच्या इमारतींचे नूतनीकरण करून डिजिटल वर्गखोल्याही सुरू केल्या आहेत. विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देता यावे म्हणून टॅबचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती कुंभार यांनी दिली.
पालिका शाळांचा ९७.१० टक्के निकाल : दहावीच्या परीक्षेत राज्याचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. तर याच परीक्षेत मुंबई महापालिकेच्या शाळांचा निकाल ९७.१० टक्के लागला आहे. २०२० च्या तुलनेत पालिका शाळांचा निकाल ३.८५ टक्क्यांनी वाढला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुदानित व विनाअनुदानित अशा एकूण २४३ माध्यमिक शाळांमधून मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेकरिता बसलेल्या १६ हजार ८०७ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ३१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मुंबई महापालिकेच्या शाळा : १,१४७, एकूण विद्यार्थी - २,९८,४९८, शिक्षकांची संख्या - १०,४२०
हेही वाचा - Water scarcity : नवदांपत्याची पाण्याच्या टँकर वरून वरात; जोपर्यंत पाणीप्रश्न मिटत नाही तोपर्यंत हनिमून नाही