मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार कमी होताच १ ली ते ७ वीच्या शाळा काही निर्बंधांमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र शाळा सुरू होताच बहुतेक शाळांनी ऑनलाइन शिक्षण बंद करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने ऑनलाइन शिक्षण ( Online Teaching ) देण्याबाबत शाळांना कडक शब्दात सूचना ( Notice to Schools ) दिल्या जातील. त्यानंतरही ज्या शाळा ऑनलाइन शिक्षण ( School Online Education ) देणार नाहीत, त्यांच्यावर राज्य सरकारच्या कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाकडून ( Municipal Education Department ) 'ईटीव्ही भारत' ला देण्यात आली आहे.
- ऑनलाईन शिक्षण बंद
मुंबईमध्ये गेले पावणे दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार कमी होत असतानाच ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचा प्रसार सुरू झाला आहे. याच दरम्यान २० महिन्यांनी मुंबईमधील १ ली ते ७ वी च्या शाळा १५ डिसेंबरपासून सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करताना मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत पाठवण्यास तयार नसतील त्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावे, असे आदेश शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिले आहेत. मात्र १५ डिसेंबरपासून शाळा सुरू होताच मुंबईमधील बहुतेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केले आहे. यामुळे कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणू प्रसाराच्या भीतीने जे विद्यार्थी शाळेत जाणार नाही त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. मुलांना शाळेत पाठवले तर विषाणूच्या संसर्गाची भीती तर शाळेत नाही पाठवले तर शैक्षणिक नुकसान होणार अशी भीती पालकांमध्ये आहे.
- कडक सूचना, नंतर कारवाई
याबाबत पालिकेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता राज्य सरकारच्या आदेशानुसार पालिकेने शाळा सुरू करण्याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यात जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत, त्यांना ऑनलाइन शिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे स्पष्ट आदेश परिपत्रक काढून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हे आमचे काम आहे. त्यानंतरही शाळांनी ऑनलाइन शिक्षण देणे बंद केले असल्यास शाळांना कडक शब्दात सूचना देण्यात येईल. विविध कारणांनी शाळेत येऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे आदेश दिले जातील. तसेच ज्या शाळा ऑनलाइन शिक्षण देत नाहीत, त्यांची तक्रार आल्यास त्यांच्यावर राज्य सरकारच्या नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली आहे.
- शाळांवर नियमानुसार कारवाई
मुंबई महापालिकेच्या परिपत्रकाप्रमाणे जे पालक संमती देतील त्याच मुलांना शाळेत शिकवले जाणार आहे. बळजबरीने कोणाकडून संमती पत्र घेऊ नये. ज्यांनी संमती पत्र दिले त्यांना शाळेत शिकवावे तसेच ज्यांनी दिले नाही त्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावे, असे शाळांना सांगण्यात आले आहे. त्यानंतरही ज्या खासगी शाळा ऑनलाइन शिक्षण देत नाहीत. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा संध्या दोषी यांनी दिली आहे.
- ३४ टक्के पालकांची संमती
राज्यातील कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने राज्य सरकारने राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. १५ डिसेंबरपासून १ ली ते ७ वी च्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. महानगरपालिका शिक्षण विभागाच्या अखत्यारीत १ ली ते ७ वीच्या २०३४ शाळा येतात. त्यापैकी आज १०९२ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. १ ली ते ७ वीपर्यंत ५,९१,८८२ विद्यार्थी आहेत. त्यापैकी ३४ टक्के म्हणजेच २ लाख ६३९ विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास परवानगी दिली आहे.
- असे असतील नियम -
- शाळा सुरु केल्यावर एका बेंचवर एका विद्यार्थी असेल.
- शाळेत २ ते ३ तास विद्यार्थी येतील
- दोन सत्राच्या मधल्या वेळात शाळा सॅनिटाईज केल्या जातील
- विद्यार्थ्यांना शाळेत मास्क घालावे लागेल
- सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागणार
- जे विद्यार्थी शाळेत येतील त्यांना ऑफलाईन शिक्षण तर जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत त्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार
- पालकांमध्ये भीती -
मुंबईत आज पासून शाळा सुरू झाल्या असल्या तरी कोरोना विषाणू आणि ओमायक्रॉन हा नवा विषाणू याचे रुग्ण आढळून येत असल्याने पालकांमध्ये भीती आहे. लहान मुलांचे लसीकरण झाले नसल्याने त्यांना कोरोना किंवा ओमायक्रॉनचा संसर्ग होऊ शकतो. या भीतीने पालकांकडून आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयारी दाखवली जात नाही.
हेही वाचा - School Reopening In Pune : पुण्यात आजपासून प्राथमिक शाळेला सुरवात...विद्यार्थ्यामध्ये उत्साह