मुंबई - मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीकरण मोहीम तळागाळापर्यंत पोहचावी यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी मुंबईकरांनी अशा व्यक्तींचे नाव महापालिकेला कळविण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार पालिका संबंधितांच्या घरी जाऊन लसीकरण करणार आहे.
लसीकरण मोहीम -
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु आहे. या लसीकरणादरम्यान आरोग्य, फ्रंटलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक, विविध आजार असलेले ४५ वर्षांवरील नागरिक, स्तनदा माता, गर्भवती महिला, मानसिक रुग्ण, १८ ते ४४ वयोगटातील नागरिक आदींचे लसीकरण केले जात आहे. लसीकरण करताना कोविन अॅपवर नोंदणी, वॉक इन तसेच ड्राइव्ह इन आदी प्रकारे लसीकरण केले जात आहे. त्यानंतर आता महापालिकेने अंथरुणावर खिळून असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या ठिकाणी माहिती पाठवा -
आजारपणासह शारीरिक, वैद्यकिय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, असेही नागरिक आहेत. अशा व्यक्तींना कोविड लस देता यावी, यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात येत आहे. त्यादृष्टीने, सर्व मुंबईकर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, ज्यांच्या घरात अंथरुणास खिळून असणारे व्यक्ती आहेत व ज्यांना अशा व्यक्तीचे कोविड लसीकरण करुन घ्यावयाचे आहे, अशा व्यक्तींची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळून असण्याचे कारण इत्यादी माहिती covidvacc2bedridden@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावी. जेणेकरून अशा व्यक्तींचे कोविड लसीकरण करणे सोईचे जाईल, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
शुक्रवारची लसीकरणाची आकडेवारी -
आरोग्य फ्रंटलाईन कर्मचारी | ७ लाख ३ हजार ५२ |
ज्येष्ठ नागरिक | १५ लाख २१ हजार ९८९ |
४५ ते ५९ वयोगट | १९ लाख १० हजार १७१ |
१८ ते ४४ वयोगट | २२ लाख ३६ हजार ९८८ |
स्तनदा माता | ३ हजार ६७४ |
गर्भवती महिला | ३४ |
मानसिक रुग्ण | ६२८ |
ओळखपत्र नसलेले कैदी, तृतीयपंथी | २०६ |
परदेशी शिक्षण घेणारे विद्यार्थी, कामगार, ऑलम्पिक खेळाडू | ११ हजार ८३१ |
- एकूण लसीकरण - ६३ लाख ८८ हजार ६७३
हेही वाचा - PowerGame? : शरद पवारांनी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट, तासभर खलबतं; तर्क-वितर्कांना उधाण