मुंबई - नवनीत राणा, रवी राणांच्या अडचणी आता पुन्हा वाढल्या आहेत. खार येथील त्यांच्या घरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी आता राणा दाम्पत्याला महापालिकेने नोटीस बजावली आहे. हनुमान चालीसा प्रकरणी राणा दाम्पत्य कारागृहात असताना आता महापालिकेने त्यांना नोटीस बाजावली आहे. खार येथील घरात बेकायदेशीर बांधकाम झाले आहे, का याची पाहणी महापालिकेचे अधिकारी करणार आहेत.
हनुमान चालीसा प्रकरण - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हिंदुत्व विसरले आहेत. त्यामुळे त्यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या "मातोश्री" या बंगल्यावर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान राणा दाम्पत्याने दिले होते. त्यासाठी राणा दाम्पत्य अमरावती येथून मुंबईत आले होते. राणा यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. याप्रकरणी राणा दाम्पत्याला पोलिसांनी 149 ची नोटीसही बजावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार असल्याने राणा दाम्पत्याने माघार घेतली. मात्र शिवसेनेने खार पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर राणा यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीसावरून मुंबईत दोन दिवस वातावरण तापले होते. या प्रकरणी राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असून ते गेले दहा दिवसापासून तुरुंगात आहेत. अद्यापही त्यांना या प्रकरणात जामीन मिळालेला नाही.
'लाव्ही' इमारतीत आहे राणा दाम्पत्यांचे घर - खार पश्चिममधील परिसरातील १४ व्या रस्त्यावर 'लाव्ही' इमारतीत राणा दाम्पत्यांचे घर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा वाचण्यास जाण्यासाठी हे दाम्पत्य मुंबईत आले, तेव्हा याच इमारतीत उतरले होते. या इमारतीत तसेच काही घरांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिक बांधकाम करण्यात आल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. पालिका नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरुन मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार नोटीस पाठवली आहे. इमारतीतील अनेक घरांमध्ये अवैध बांधकामे करण्यात आल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. काही घरांना या आधी नोटीस पाठवली आहे. राणा दाम्पत्याच्या घरालाही नोटीस पाठवल्याची माहिती महापालिकेच्या वांद्रे एच पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.