मुंबई - आज समुद्राला मोठी भरती होती. भरतीदरम्यान समुद्रात मोठ्या लाटा उसळतात. या लाटांबरोबर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेला तब्बल 188 टन कचरा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उचलल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
![garbage](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4033669_244_4033669_1564852945473.png)
मुंबईत मरिन लाईन्स, गिरगाव, दादर, माहीम, वर्सोवा, गोराई आदी चौपाट्या आहेत. या चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि नागरिक मौजमजा करायला जातात. त्यावेळी नागरिक समुद्रात मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात. तसेच नाल्यांमधून टाकण्यात आलेला कचरा समुद्रात जातो. मात्र भरतीच्या वेळी समुद्र हा कचरा किनाऱ्यावर टाकून देतो.
![garbage](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4033669_413_4033669_1564852922033.png)
आज समुद्राला 4.90 मीटरची मोठी भरती होती. यादरम्यान समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या होत्या. या लाटांबरोबर समुद्रातील कचरा चौपाट्यांवर जमा झाला. मरिन लाईन येथे 15 मेट्रिक टन, गिरगांव चौपाटी येथे 5 मेट्रिक टन, दादर- माहीम येथे 50 मेट्रिक टन, वर्सोवा - जुहू येथे 110 मेट्रिक टन तर गौराई 8 मेट्रिक टन कचरा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उचलला.