मुंबई - हजारो लोकांचा जीव घेणाऱ्या कोरोना विषाणुचे रुग्ण मुंबईत आणि महाराष्ट्रात आढळून आले आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या आणखी वाढू नये म्हणून विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी कोरोनाचे रुग्ण असलेल्या रुग्णालयांच्या जवळची वाहतूक बंद करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.
'कोरोना'चे रुग्ण वाढत असल्याने 'कोरोना'वर उपचार सुरू असेलेल्या कस्तुरबा रुग्णालय, सेव्हन हिल्ससह केईएम रुग्णालय परिसरातील वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत. त्यासाठी पालिका आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे. त्यात खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी, शाळा, स्विमिंग पूल, जिम, चित्रपटगृह बंद ठेवावीत असे निर्देशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. कार्यक्रम आयोजित करू नयेत, चौपाटीवर एकत्र जमू नये अशा सूचना ही देण्यात आल्या आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवांना मात्र वगळण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळून गरज असेल तर केवळ ५० टक्के स्टाफ ला कामावर बोलवावे असेही आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.