मुंबई - मुंबईची जीवन वाहिनी असलेल्या लोकल ट्रेनच्या प्रवासात मुंबईकरांचा बराच वेळ जातो. धावत्या लोकलमध्ये ( Wi-Fi in Local Trains ) नेटवर्क प्रॉब्लेम होत असल्याने प्रवाशांचे अनेक कामेही खोळंबतात. यामुळे लोकल प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने दोन वर्षांपूर्वी धावत्या लोकलमध्ये वायफाय सेवा देण्याची घोषणा केली होती. मात्र, कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प नवीन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात लोकल प्रवाशांना धावत्या ट्रेनमध्ये निशुल्क वायफाय सेवा मिळणार आहे.
3 हजार 465 डब्यात बसवणार वायफाय -
एसटी महामंडळाने गेल्या काही वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीशी करार करून राज्यभरातील 18 हजार एसटी बसेसमध्ये ‘प्री-लोडेड’ वायफाय सुविधा देण्यातली होती. त्यामुळे धावत्या एसटीत प्रवाशांना इंटरनेट सुविधा मिळत होती. एसटी महामंडळाच्या धरतीवर मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये ही ‘प्री-लोडेड’ इंटरनेट सेवा देण्याची घोषणा दोन वर्षापूर्वी मध्य रेल्वेकडून करण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणी आणि त्यानंतर कोरोनामुळे हा प्रकल्प रखडत जात होता. मात्र, रेल्वेने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता कंबर कसली असून नव्या वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे काम रेल्वेने सुरू केले आहे. एका खासगी कंपनीमार्फत मध्य रेल्वेच्या 165 लोकलमधील 3 हजार 465 डब्यात वायफाय लावण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक डब्यात एक वायफाय लावले जात असून काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे.
काय आहे ‘प्री-लोडेड’ वायफायची सुविधा..?
‘कंटेट ऑफ डिमांड’ अंतर्गत लोकलमध्ये बसवण्यात येणाऱ्या वायफाय सुविधेमध्ये प्री-लोडेड चित्रपट, मालिका आणि गाणी यांचा समावेश असेल. प्रवाशांना केवळ मोबाइल वायफाय सुरू करणे गरजेचे आहे. वायफाय लॉगइन केल्यानंतर प्रवाशांना ‘प्री-लोडेड’ माहिती मोबाइलवर पाहायला मिळेल. यामुळे प्रवाशांच्या इंटरनेट डेटाची देखील बचत होणार आहे.
याठिकाणी सर्वाधिक इंटरनेट प्रॉब्लेम -
लोकलमध्ये प्रवास करताना प्रवाशांना इंटरनेट सुरळीत चालण्यास अनेक अडथळे येतात. जसे ‘घाटकोपर-विक्रोळी दरम्यान इंटरनेटला रेंज नसणे’, ‘ऑनलाइन कार्यक्रम पाहताना पारसिक बोगद्यात ‘बफरचा’ सामना करावा लागणे’ मात्र आता या त्रासापासून सुटका होणार आहे. कारण नव्या वर्षात मुंबईकरांचे लोकलमध्ये मनोरंजन होणार आहे. मध्य रेल्वेकडून स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्यात आली होती. त्याला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळात आहे. त्यातच पार्श्वभूमीवर धावत्या लोकलमध्ये प्रवाशांना वायफाय सुविधा देण्याची घोषणा रेल्वेने केली होती. मात्र, कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प नवीन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.
हेही वाचा - PM Narendra Modi Goa Tour : गोवा मुक्ती दिनानिमित्त मोदी गोवा दौऱ्यावर; अनेक कामांचा करणार शुभारंभ