मुंबई - दिवसाची सुरवात ज्या दुधाने वा दुधाच्या चहाने होते. ते दूध तितकेच पौष्टिक, शुद्ध आणि सुरक्षित असायला हवे. पण प्रत्यक्षात मात्र मुंबईकरांपर्यंत कमी दर्जाचे, असुरक्षित दूध पोहचत असल्याची धक्कादायक बाब अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) च्या कारवाईतून समोर आली आहे. काल आणि आज एफडीएने मुंबईच्या 5 जकात नाक्यांवर दुधाच्या टॅंकरची, वाहनांतील 6,63,093 लीटर दुधाची तपासणी केली. तर यातील 3632 लीटर कमी दर्जाचे दूध मुंबईत विक्रीसाठी नेले जात असल्याचे आढळले. हे दूध तात्काळ परत पाठवण्यात आले असून 7 नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान परत पाठवण्यात आलेल्या दुधाची एकूण किंमत 1,71,600 रुपये अशी आहे.
पाच जकात नाक्यांवर तपासणी-
दूध भेसळीविरोधात एफडीएकडुन नियमित तपासणी केली जाते. मात्र तरीही दुधातील भेसळ काही कमी होताना दिसत नाही. पाणी टाकून दूध विकले जाते पण याचबरोबर दुधात स्टार्च टाकले जाते. असे दूध शरीरास घातक असते. अशावेळी मुंबईत कमी दर्जाचे, पाणी टाकलेले दूध मोठ्या संख्येने येत असल्याच्या अनेक तक्रारी असतात. याच पार्श्वभूमीवर काल (21 जानेवारी) आणि आज (22 जानेवारी) अशी दोन दिवस मुंबईतल्या पाच जकात नाक्यांवर तपासणी केली. मानखुर्द, दहिसर, मुलुंड, ऐरोली आणि एलबीएस या जकात नाक्यांवर ही तपासणी झाली.
170 वाहनांची तपासणी-
मानखुर्द 48, दहिसर 66, मुलुंड, ऐरोली 25 आणि एलबीएस 6 अशा एकूण 170 वाहनांची तपासणी यावेळी करण्यात आली. यावेळी 254 नमुन्यांची तपासणी केली असता यात 7 नमुने कमी दर्जाचे आढळले आहेत. त्यानुसार हे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल आल्यास पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तर जे नमुने कमी दर्जाचे आढळले ते दूध परत पाठवण्यात आल्याची माहिती शशिकांत केकरे, सहआयुक्त, बृहन्मुंबई (अन्न), एफडीए यांनी दिली आहे. या दुधाची किंमत 1, 71, 600 रुपये इतकी आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दूध खरेदी करताना आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
हेही वाचा- केंद्रीय अर्थसंकल्प: परंपरेप्रमाणे उद्या होणार हलवा समारंभ; अर्थसंकल्पाची होणार नाही छपाई