मुंबई- ब्रिटिश काळात बेस्टद्वारे 'ट्राम' ही गाडी चावली जायची. महापालिका आणि बेस्टने या ऐतिहासिक 'ट्राम'चे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईच्या रबाळे येथील गॅरेजमध्ये 'ट्राम' तयार झाली असून नुकतीच ती महापालिका मुख्यालयासमोरील भाटिया बागेत ठेवण्यात आली आहे. या ट्रामचे लवकरच उद्घाटन केले जाणार असून त्यानंतर ही मुंबईकरांसाठी खुली केली जाणार आहे.
मुंबईत रेल्वे आणि बेस्ट बस यामधून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे रेल्वे आणि बेस्टला मुंबईची लाईफलाईन बोलले जाते. मुंबईची दुसरी लाइफलाईन असणारी ‘बेस्ट’ही 'ट्राम' द्वारे सेवा देत होती. 'ट्राम' बस ३१ मार्च १९६४ पासून बंद करण्यात आली. कालांतराने मुंबईतील ट्रामचे रूळही दिसेनासे झाले. मात्र, ट्रामविषयी मुंबईकरांच्या मनात आजही आकर्षण आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने आजच्या पिढीतील मुंबईकरांना ऐतिहासिक 'ट्राम'ची ओळख व्हावी म्हणून प्रदर्शनाच्या रूपाने भाटिया गार्डनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रामचा डबा रबाळे येथील एन्थोनी गॅरेज येथे तयार करण्यात आला आहे. दीड महिन्यांच्या अथक परिश्रमाने ट्रामचा नवीन डबा तयार करण्यात आला आहे. हा ट्रामचा डबा जुन्या रूपात हुबेहूब पाहता येणार आहे. ट्रामचा डबा भाटिया उद्यानात ठेवण्यात आला असून लवकरच त्याचे उद्घाटन करून मुंबईकरांना पाहण्यासाठी खुला केला जाणार आहे. अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
‘ट्राम'चा प्रवास-
९ मे १८७४ रोजी घोड्यांद्वारे ओढली जाणारी पहिली ट्राम मुंबईमध्ये धावली. सुरुवातीला ट्रामच्या तिकीटाचा दर हा तीन आणे होता. सुरुवातीला छापील तिकीट नव्हते. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर तिकीटाचा दर दोन आणे झाला. त्यानंतर काही महिन्यांनी तिकिटे छापण्यात आली. १९०५ मध्ये ‘बेस्ट’ म्हणजेच ‘बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अँड ट्राम'वे कंपनीची स्थापना झाली. १९०७ मध्ये घोड्यांच्या सहाय्याने ओढल्या जाणार्या ट्राम बंद करण्यात आल्या. त्यानंतर मुंबईमध्ये पहिली इलेक्ट्रीक ट्राम धावली. १९२६ मध्ये डबल डेकर ट्रामही शहरात आली. कंपनीने शहरामध्ये बससेवा सुरू करण्यासाठी निर्णय घेतला. १५ जुलै १९२६ मध्ये शहरात पहिली बस अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या रस्त्यावर धावली होती.