मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजीपार्क येथे जिजाऊ माँ साहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर पूरग्रस्तांसाठी शिवसहाय्य सामग्री घेऊन जाणारी वाहने रवाना करण्यात आली. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मंत्री सुभाष देसाई, शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्या भागात पूर ओसरला आहे त्या महाड, वाई, पाटणसाठी शिवसेनेची मदत पथके देखील आजच रवाना झालेली आहेत. जिल्हाधिकारी आणि प्रशासनाशी संपर्क साधूनच मदत पाठविण्याची योजना शिवसेनेने आखली आहे. कोल्हापूर-सांगलीमधील काही भागात अजूनही पूराचे पाणी ओसरले नसल्याने तिथे इतक्यात मदत न पाठवण्याचे प्रशासनाने सांगितले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
आम्ही सुखी कोरडी सहानभूती दाखवायला तिकडे जाणार नाही - उद्धव ठाकरे
आम्ही कोकणातही मदत पाठवली आहे. शिवसेना संपुर्ण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत पोहचवत आहे. आम्ही सुखी कोरडी सहानभूती दाखवायला तिकडे जाणार नाही, आम्ही आमच्या पद्धतीने सहकार्य करतोय असे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर न जाण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले.