मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांनी सोमवारी (दि. 3 जानेवारी) मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नसून जामीन अर्जावर 11 जानेवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे.
100 कोटी कथीत वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल बारा तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर गेल्या 65 दिवसांपासून अनिल देशमुख हे जेलमध्ये आहेत. अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7 हजार पानांचे पुरवणी आरोपपत्रही दाखल केले आहे. यामध्ये अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या मेव्हण्यालाही सहआरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.
अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला सक्त वसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने फरार घोषित केले आहे. या प्रकरणात एकूण तिघांना ईडीने फरार घोषित केले आहे. वारंवार समन्स देवूनही अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख हा चौकशीला हजर राहिला नाही. मात्र, याप्रकरणी अटकेपासून आपल्याला संरक्षण मिळावे यासाठी ऋषिकेश देशमुख याने न्यायालयात धाव घेतली होती. पण, याप्रकरणी अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरूच आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.
हे ही वाचा - Fadnavis Vs Sattar : नया है वह! देवेंद्र फडणवीस यांचा अब्दुल सत्तार यांना टोला