मुंबई - महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोना व नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यातच मुंबईतील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा (Mumbai Schools Closed) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू राहणार आहे. हा निर्णय फक्त मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांसाठी आहे.
मुंबईतील 1 ली ते 8 वी च्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद (Mumbai Schools Closed ) ठेवण्यात येणार आहे. कोरोना आणि ओमायक्रॉनच्या प्रसारामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- मुंबईतील पहिली ते 9 वी आणि 11 वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार
- मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा 4 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान बंद राहणार.
- कोरोना आणि ओमायक्रॉनच्या प्रसारामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय
- या दरम्यान शाळा ऑनलाईन सुरू राहतील
- लसीकरणाला 15 ते 18 वयोगटातील मुलांना बोलवता येईल
- 10 वी व 12 वीच्या शाळा सुरू राहणार
कोरोनामुळे देशातील अन्य राज्यातील निर्बंध कडक, शाळा-महाविद्यालये बंद -
कोरोना व ओमायक्रॉन संसर्गामुळे बंगालमधील शाळा बंद -
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असून, त्यामुळे तेथील राज्य सरकारने तातडीने अनेक कडक निर्बंध लागू केले आहेत. बंगालमध्ये आज ३ जानेवारीपासून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच कोरोना रुग्णांची संख्या वाढलेल्या दिल्ली, मुंबईहून पश्चिम बंगालला आठवड्यातून केवळ दोन दिवसच विमानसेवेस मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी परवानगी दिली आहे. विमानसेवेबाबतचा आदेश उद्यापासून ( मंगळवार) अंमलात येईल.
दिल्लीतील शाळाही बंद -
राष्ट्रीय राजधानीत दोन आठवड्यांत ओमायक्रॉनच्या प्रकरणांमध्ये 2-3 टक्क्यांवरून 25-30 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्यानंतर दिल्ली सरकारने 'यलो अलर्ट' जाहीर केला आहे. त्यानंतर लगेचच, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (DDMA) नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून पुढील आदेशापर्यंत शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था बंद ठेवाव्या लागल्या. तसेच, सरकारने पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी हिवाळी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
यूपीमध्येही शाळांना हिवाळी सुट्ट्या -
नोएडा, गाझियाबाद, हापूर आणि ग्रेटर नोएडामधील ओमायक्रॉन प्रकरणांमध्ये वाढ आणि थंडीच्या लाटेमुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने इयत्ता 8 वी पर्यंतच्या सरकारी शाळांमध्ये हिवाळी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. शाळा 31 डिसेंबर 2021 ते 14 जानेवारी 2022 पर्यंत 15 दिवस बंद राहणार आहेत. मात्र, खाजगी शाळांसाठी कोणतीही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेली नाही.
हरियाणामध्येही 12 जानेवारीपर्यंत शाळा बंद -
ओमिक्रॉन प्रकरणांमध्ये तीव्र वाढ पाहिल्यानंतर, राज्य सरकारने शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यासह नवीन निर्बंध जाहीर केले. या सूचनेनुसार, राज्य सरकारने शाळांना हिवाळी सुट्टी जाहीर केली असून ती १२ जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे.