मुंबई - मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनचा तुटवडा झाला होता. यासाठी पालिकेने रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्ट बसवण्याचा निर्णय घेतला. यासाठी पालिका बाजार मूल्यापेक्षा ३० कोटींचा अधिक निधी खर्च करत आहे. याबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दिली आहे. ऑक्सिजन प्लान्ट बसवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदाराला अद्याप कार्यदेश म्हणजेच काम करण्याची परवानगी देण्यात आली नसल्याचे पालिकेने कळविले आहे.
असे देण्यात आले काम
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिकेकडून माहितीच्या अधिकार कायद्यात ऑक्सिजन प्लान्ट बद्दल माहिती मागवली होती. त्यानुसार कार्यकारी अभियंता शाम भारती यांनी दिलेल्या माहितीत मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी प्रतिसादात्मक असून 83.83 कोटी रक्कमेत काम देण्यात येणार आहे. या सर्व ऑक्सिजन निर्मिती यंत्रणेचे पुरवठा, प्रस्थापना, चाचणी व कार्यान्वितीकरण करण्यासाठी 77.15 कोटी रुपये रक्कम दाखविण्यात आली. वार्षिक देखभाल खर्च म्हणून 1.31 कोटी रुपये दर्शविण्यात आले आहे. पुढील पाच वर्ष बहुव्यापक सर्वसमावेक्षक संधारण व परिरक्षण करण्याकरिता रुपये 5.36 कोटी असे सर्व मिळून रुपये 83.83 कोटींची शिफारस करण्यात आली. सदर निविदा काढण्यापूर्वी पालिकेने आयआयटी किंवा अन्य सापेक्ष तांत्रिकदृष्टया योग्य असलेल्या संस्थेकडून मार्गदर्शन घेतले असल्यास त्याची माहिती विचारली असता निरंक असे उत्तर देण्यात आल्याचे गलगली यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आयुक्त इकबालसिंह चहल यांस पाठविलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, 850 लीटर क्षमतेचे ऑक्सिजन निर्मिती यंत्रांची किंमत ही बाजारात रुपये 65 लाखापर्यंत आहे. लीटर क्षमतेत वाढ झाल्यास काही प्रमाणात किंमत वाढते. पालिकेने रुपये 86.42 कोटी इतक्या रक्कमेचे अंदाजपत्रक तयार केले. निविदा प्रक्रियेत मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीने रुपये 92.85 कोटींची रक्कम उद्युत केली. वाटाघाटी करण्याच्या नावावर रुपये 9.02 कोटी इतकी सवलत दाखवित अखेर हे काम रुपये 83.83 कोटी रुपयांना देण्यात आले आहे. याकामी मुख्यमंत्री सचिवालयातून सूत्रे हलविण्यात आल्याने पालिकेने विशेष स्वारस्य घेतले नाही, असे गलगली यांना कळवण्यात आले आहे.
..तर 30 कोटी वाचले असते
ऑक्सिजन प्लान्टचे अंदाजपत्रक फुगवून बनविण्यात आले तेव्हा अशी रुपये 9 कोटींची सवलत कोणीही देऊ शकतो, असा दावा करत अनिल गलगली म्हणाले की, जेव्हा बाजारात कमी किंमतीत ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा आहे. मग विशिष्ट कंत्राटदारांकडून अवाढव्य किंमतीत ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा घेणे ही चुकीची बाब आहे. अंदाजपत्रक ज्यावेळी बनविण्यात येते तेव्हा बाजारात एक फेरफटका मारून किंमती समजुन घेण्याचा छोटासा प्रयत्न केला असता तर आज पालिकेचे रुपये 30 कोटी सहजरित्या वाचले असते.
हेही वाचा - मुंबईत २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण - महापौर किशोरी पेडणेकर
हेही वाचा - 'राज्यकर्त्या राजाची पुंगी वाजवणे देशभक्ती नाही; परखड बोल सुनावणे ही खरी राष्ट्रनिष्ठा'