मुंबई - कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात ऑगस्ट महिन्यात नियंत्रणात येण्याची चिन्हे दिसत होती. मात्र, धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. मुंबईत शुक्रवारी कोरोनाच्या नव्या 1 हजार 823 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 37 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 1644 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
शुक्रवारी कोरोनाने मृत्यू झालेल्या 37 पैकी 33 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 26 पुरुष तर 11 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 38 हजार 548 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 9 हजार 635 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1644 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. रुग्णालयात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 2 लाख 05 हजार 111 वर गेला आहे. सध्या, मुंबईत कोरोनाचे 19 हजार 608 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 82 दिवस तर सरासरी दर 0.90 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 645 चाळी आणि झोपडपट्टी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 9 हजार 905 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी महापालिकेकडून 13 लाख 25 हजार 537 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मुंबई महापालिकेने मिशन बिगीन अतंर्गत हॉटेल, बारसह दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेत वाढ केली आहे.