मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची लोकसंख्या ही 1 कोटी 80 लाखांच्या आसपास असताना या लोकसंख्येची सुरक्षेची जबाबदारी 42 हजार मुंबई पोलिसांवर आहे. मुंबईतल्या वेगवेगळ्या परिसरांमध्ये मुंबई पोलिसांकडून पेट्रोलिंग केली जाते. गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामात आणखी नियमितता यावी म्हणून मुंबई पोलिसांकडून आता 'क्यूआर कोड' च्य माध्यमातून पेट्रोलिंग केली जात आहे.
कशी होते पेट्रोलिंग
मुंबई शहरात 94 पोलीस ठाणी असून या 94 पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना त्यांच्या परिसरात असलेल्या 60 संवेदनशील जागांवर पेट्रोलिंग करण्यासाठी क्यूआर कोड लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत गस्त घालणाऱ्या पोलीस पथकांच्या कामाची तीन प्रकारात विभागणी करण्यात आली आहे. 'अ' प्रकारच्या विभागात प्रत्येक 2 तासानंतर संबंधित परिसरामध्ये पोलीस पथकाला गस्त घालावी लागते. 'ब' वर्गीकरणामध्ये दिवसातून एकदा पोलीस पथकाला नमूद केलेल्या परिसरामध्ये जाऊन पेट्रोलिंग करावी लागते. तर 'क' वर्गातील पोलीस पथकाला आठवड्यातून एकदा त्यांना दिलेल्या परिसरात जाऊन गस्त घालावी लागते.
व्हिजिबल पोलीस पेट्रोलिंग
मुंबईत सध्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 60 ठिकाणी क्यूआर कोड लावण्यात आले असून, यामध्ये सरकारी कार्यालय, उद्यानं, सार्वजनिक ठिकाणं, शाळा व इतर संवेदनशील जागांचा समावेश यात करण्यात आला आहे. या क्यूआर कोडच्या माध्यमातून गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला प्रत्येक वेळेस हा क्यूआर कोड स्कॅन करायचा आहे. यानंतर नमूद केलेल्या परिसरामध्ये गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने कितीवेळा गस्त घातली याची चाचपणी मुंबई पोलीस खात्याकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा - आमदार पडळकरांच्या भावासह १२ जणांवर गुन्हा दाखल, सांगली जिल्ह्यात मंदिरात चप्पल घालून आल्याचा वाद
हेही वाचा - आ. भास्कर जाधव यांनी महाराष्ट्र पोलिसांची माफी मागावी - निलेश राणे