मुंबई- कोरोना विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाय योजना केल्या जात आहेत. राज्यात लॉकडाऊनचा 5 वा टप्पा सुरु आहे. पोलिसांकडून लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी शहरात कलम144 लागू करण्यात आले आहे.20 मार्च ते 11 जून या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन केल्याच्या 7289 प्रकरणात तब्बल 14935 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 1274 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्या 1956 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तब्बल 3895 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे , तर 9084 आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडून दिलेले आहे.
लॉकडॉऊन काळामध्ये कलम 188 नुसार दक्षिण मुंबईत 918 गुन्हे, मध्य मुंबईत 2009, पूर्व मुंबई 1224, पश्चिम मुंबईत 1850 आणि उत्तर मुंबईत 1288 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे विनापरवानगी दुकान किंवा हॉटेल उघडी ठेवण्यासंदर्भात, पानटपरी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे व अवैध वाहतूक प्रकरणी नोंदविण्यात आले आहेत.
मुंबई पोलीस खात्यात आतापर्यंत 2028 पोलीस कोरोना संक्रमित झाले आहेत. यामध्ये 290 पोलीस अधिकारी व 1738 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी 1233 जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. मुंबईतील वेगवेगळ्या कोविड सेंटर मध्ये 516 पोलीस दाखल असून , 224 पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
होम आयसोलेशन मध्ये 33 पोलीस कर्मचारी असून, 335 पोलीस सध्या उपचार घेऊन घरी गेले आहेत. कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन 564 पोलिस अद्याप कामावर रुजू झालेले नाहीत. तब्बल 334 पोलिसांनी कोरोनामुक्त होऊन पुन्हा कामावर येण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलीस खात्यात कोरोना संक्रमणामुळे 22 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. एसआरपीएफ पोलीस खात्यात 82 जणांना कोरोनाची लागण झाली असून यात 5 पोलीस अधिकारी व 77 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.