मुंबई - मुंबई शहरामध्ये मुंबई पोलिसांकडून 8 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश ( Curfew Orders In Mumbai ) लागू करण्यात आले आहे. शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था बाधित राहण्यासाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आले असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे एक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक उपस्थित राहता येणार नाही. तसेच काही ठिकाणी मुंबई पोलिसांनी जमावबंदीचे आदेशमधून वगळण्यात आले आहे. बृहन्मुंबई हद्दीत शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपायुक्त अभियान यांनी आज मध्यरात्रीपासून बृहन्मुंबई हद्दीत 8 एप्रिल 2022पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.
शहरात जमावबंदीचे आदेश -
दहशतवादी असोत किंवा गुन्हेगारी असो किंवा मोर्चे, आंदोलनं असो, मुंबई हे शहर केंद्रस्थानी असते. त्यामुळे, मुंबई शहरात नेहमीच मोठा बंदोबस्त तैनात असतो. पर्यटनाच्यादृष्टीनेही मुंबई पाहायला जगभरातून लोकं येतात. त्यामुळे, या शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हानच असते. तरीही, मुंबई पोलीस आपले पूर्ण योगदान देत मुंबईचं स्पीरट कायम धावतं ठेवतात. त्यासाठी, अनेकदा महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. आता, मुंबई पोलिसांनी शहरात जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.
बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 8 एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. त्यानुसार 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, संगीतीय बँड, फटाके फोडण्यास प्रतिबंध केल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले आहे. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 8 एप्रिलपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी उपकरणीय वापरांवर बंदी घालण्यात आल्याचे आदेश पोलीस उपआयुक्तांनी जारी केले आहेत. होळी, धुलीवंदन आणि नंतर रंगपंचमीचा सण साजरा होत आहे. त्यानंतर, गुढी पाडव्याचाही सण येतो आहे. मात्र, मुंबई शहरासाठी जमावबंदीचे आदेश काढण्यात आल्याने 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
तेथे जमावबंदी लागू राहणार नाही -
विवाह समारंभ आणि विवाहप्रथेशी संबंधित अन्य समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था आणि संघटनांच्या वैधानिक बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून होणारे कार्यक्रम यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे.